MI vs PBKS Match Highlights Video: मुल्लानपूर येथील PCA स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध IPL २०१४ च्या सामन्याच्या शेवटच्या षटकात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या आपल्याच हाती घेतली. PBKS ला शेवटच्या षटकात १२ धावांची आणि मुंबई इंडियन्सला अवघ्या एका विकेटची गरज होती. कागिसो रबाडा आणि हर्षल पटेल हे दोघेही अन्य संघातील १० व्या ११ व्या स्थानी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा कित्येक पटीने उत्तम आहेत, अगदी १९ व्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेल्या चेंडूवर रबाडाच्या हुक शॉटचा षटकार हे सिद्ध करतो. त्यामुळे अर्थातच मुंबई इंडियन्ससाठी ही शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती, त्यामुळेच कदाचित यावेळी कसलाही विचार न करता रोहित शर्मा आपल्या कर्णधाराच्या भूमिकेत परतला.
मूळ कर्णधार हार्दिककडे शेवटच्या षटकांसाठी दोन पर्याय होते – वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोमारियो शेफर्ड आणि अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज आकाश मढवाल. आकाशने खरंतर यापूर्वी ३ षटकात ४४ धावा दिल्या होत्या परंतु हार्दिकने तरीही त्याच्यावर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला. षटक सुरू होण्यापूर्वी तो मढवालशी संभाषण करताना दिसला आणि तिथेच रोहितने मध्यस्थी केली.
फिल्डिंग लावण्याचं कोडं, हार्दिकच्या मदतीला गेला रोहित?
एकीकडे, फील्ड सेट करण्याचे काम एमआयसाठी अधिक क्लिष्ट बनले होते, त्यांच्या संथ ओव्हर रेटमुळे नियमित पाच ऐवजी शेवटच्या वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना सेट करण्याची परवानगी होती. त्यातही रोहितला बहुधा हार्दिकने केलेली फिल्डिंगची रचना आवडली नसावी ज्यामुळे तो हार्दिक व आकाश बोलत असताना तिथे पोहोचला. रोहितचा ऑल टाइम चाहता असलेल्या आकाशने सुद्धा यावेळी माजी कर्णधाराचा सल्ला विचारला. हार्दिककडे पूर्णतः दुर्लक्ष झाले नसले तरी रोहित आक्रमकपणे गोष्टी समजावत होता हे सध्या समोर येणाऱ्या व्हिडीओजमधून दिसतेय. तिघांनीही भरपूर हातवारे करत चर्चा केली आणि अखेरीस आकाशला सल्ला देऊन रोहित व हार्दिक आपापल्या ठिकाणी परतले.
हे ही वाचा<< मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पांड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
बुमराह व किशनही गोंधळात
दरम्यान, मुंबई इंडियन्सने पहिल्या सहा PBKS विकेट्स फक्त ७७ धावा देत घेतल्या होत्या पण त्यानंतर सातवी विकेट घेण्यासाठी त्यांना शशांक सिंगच्या २५ चेंडूतील ४१ धावांचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमध्ये भीती व गोंधळ स्पष्ट दिसत होता. त्यामुळेच हे सर्व घडत असताना, जसप्रीत बुमराह आणि क्षेत्ररक्षक इशान किशन सुद्धा फिल्डिंगविषयी चर्चा करताना दिसले. नंतर पुन्हा मुंबई इंडियन्सने वेग धरला असला तरी आशुतोष शर्मा व रबाडा यांना सामोरे जाणे एमआयसाठी कठीण ठरले. अखेरीस नऊ धावा शिल्लक असताना अगदी नाट्यमय पद्धतीने रबाडाला बाद करू मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील तिसरा विजय आपल्या नावे केला.