Rohit Sharma says Life has come full circle: आयपीएलच्या १६ व्या मोसमातील २५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर १४ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघाचे आता पाच सामन्यांत सहा गुण झाले आहेत. रोहित शर्माचा संघ आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या विजयात अर्जुन तेंडुलकरने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने अर्जुनचे कौतुक केले.
आयुष्य एक पूर्ण वर्तुळात आले आहे –
रोहित शर्मा म्हणाला, “अर्जुनसोबत खेळणे खूप रोमांचक आहे. आयुष्य एक पूर्ण वर्तुळात आले आहे.” रोहितने अर्जुनचे वडील, महान सचिन तेंडुलकरसोबत भारतीय आणि एमआय संघांसाठी ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. रोहित पुढे म्हणाला, “अर्जुन तीन वर्षांपासून या संघासोबत आहे. त्याला काय करायचे आहे हे त्याला समजते. त्याच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे. तो त्याच्या योजनांमध्ये स्पष्ट आहे. तो नवीन चेंडू स्विंग करण्याचा आणि शेवटच्या षटकांमध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो.”
हेही वाचा – IPL 2023: ”… म्हणून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात अश्रू आले”, इयान बिशपचा मोठा खुलासा
अर्जुन काय म्हणाला –
सामन्यानंतर आपल्या कामगिरीविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, “आयपीएलमध्ये पहिली विकेट घेणे माझ्यासाठी नक्कीच खूप छान होते. मला फक्त आमच्या हातात काय आहे, योजना काय आहे आणि ती कशी अंमलात आणायची यावर लक्ष केंद्रित करायचे होते. आमची योजना होती. फक्त ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची, जेणेकरून फलंदाज मैदानाच्या लांब टोकाकडे मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतील.”
सचिनने अर्जुनला काय सल्ला दिला –
अर्जुन पुढे म्हणाला, “मला गोलंदाजी आवडते, कर्णधार जेव्हा मला सांगेल तेव्हा मला गोलंदाजी करण्यास आनंद होतो. मी फक्त संघाच्या योजनेवर ठाम राहण्याचा आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही (सचिन तेंडुलकर आणि अर्जुन) क्रिकेटबद्दल बोलतो.आम्ही सामन्यापूर्वी रणनीतीवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक सामन्यापूर्वी सराव करत राहण्यास सांगतात. मी फक्त माझ्या रिलीजवर लक्ष केंद्रित केले आणि चांगली लेन्थ आणि लाइन गोलंदाजी केली. जर स्विंग मिळाला तर तो एक बोनस आहे, जरी नाही मिळाला तरी ठीक आहे.”