आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. सलग सात सामने गमावल्यानंतर आता मुंबई इंडिन्स प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याचा शर्यतीतून अगोदरच बाहेर पडला आहे. दरम्यान, न्यूझीलंड तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने रोहित शर्माच्या खेळाबाबत मोठे भाष्य केले आहे. रोहित शर्माने फलंदाजीसाठी सलामीला खेळू नये असे व्हेटोरीने म्हटले आहे.
हेही वाचा >> मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने दिल्या खास शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…
डॅनियल व्हेटोरीने ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना रोहित शर्माच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे. “रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हा निर्णय घेणे तसे अवघड आहे. मात्र रोहितची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्याने सलामीला फलंदाजी करण्यापेक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येणे योग्य होईल. यामुळे त्याच्या खेळात सुधारणा होऊ शकते. तसेच त्याच्यावरील दडपणदेखील कमी होऊ शकते,” असे व्हेटोरीने म्हटले आहे.
हेही वाचा >> केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत समोर आली मोठी माहिती, जवळचा मित्र म्हणाला…
दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्मा चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्याने या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीविरोधात खेळताना ४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर एकाही सामन्यात त्याला चांगली खेळी करता आलेली नाही. मागील सहापैकी एकाही सामन्यात त्याला ३० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. तसेच यापैकी तीन सामन्यात त्याने १० पेक्षा कमी धावा केलेल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळताना तर त्याला खातंदेखील खोलता आलेलं नाही. आज मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सविरोधात सामना होणार आहे. या सामन्यात रोहित काय कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.