‘मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. रोहित शर्मा सलग १० वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वातच मुंबईने ५ जेतेपदं पटकावली आहेत. आता सिंहावलोकन करताना असं वाटतं की यंदाही त्यानेच नेतृत्व केलं असतं आणि हार्दिक २०२५ हंगामापासून कर्णधार झाला असता. मुंबईच्या संघव्यवस्थापनाने तो निर्णय घेतला. पण मला वाटतं मुंबईचा संघ चांगलं क्रिकेट खेळला नाही. त्यांच्या खेळात सातत्य नव्हतं. प्लेऑफमध्ये धडक मारण्याची त्यांच्यात क्षमता होती. मी यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्लेऑफचे चार संभाव्य संघ निवडले होते त्यात मुंबईचा संघ होता. नवा कर्णधार होता. खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते. या सगळ्याचा परिणाम खेळात दिसून आला’, असं भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी सांगितलं. जिओ सिनेमासाठी आयपीएल एक्सपर्ट म्हणून कार्यरत कुंबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई इंडियन्स संघाने हंगामाच्या आधी हार्दिक पंड्याला ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक हा मुंबई इंडियन्सच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे. अनेक वर्ष मुंबईच्या संघाचा अविभाज्य भाग असलेल्या हार्दिकला मुंबईने २०२२ लिलावाआधी रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्स या नव्या संघाने हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवली. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून दिलं. २०२३ म्हणजे गेल्या वर्षीही गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली. सामन्याचं पारडं गुजरातच्याच बाजूने होतं पण चेन्नईने थरारक विजय साकारला. मुंबई इंडियन्सने भविष्याचा विचार करुन हार्दिकला संघात घेतलं. रोहित शर्मा भारतीय संघाचा तिन्ही प्रकारात कर्णधार आहे. दुखापती आणि वय पाहता तो किती वर्ष आयपीएल खेळेल सांगता येत नाही. याच विचारातून मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चाहत्यांना रुचला नाही. लाडक्या रोहितला बाजूला करुन हार्दिकला नेमणं त्यांना आवडलं नाही. सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष मैदानातही हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली. यासंदर्भात कुंबळे म्हणाले की कदाचित मुंबईने रोहितला हा हंगाम नेतृत्व करू दिलं असतं तर बरं झालं असतं.
यंदाच्या हंगामात दोनशेहून अधिक धावा सातत्याने होत आहेत. चेंडूच्या ठिकऱ्या उडून षटकार मारले जात आहेत. गोलंदाजांनी याला कसं सामोरं जावं यासंदर्भात कुंबळे यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘गोलंदाजांसाठी हे खरंच खूप कठीण आहे. मला असं वाटतं की बाऊंड्री अधिकाअधिक दूर नेणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्याला सर्वाधिक अंतराची बाऊंड्री देण्यात यावी. डगआऊट प्रेक्षकांमध्ये नेलं जाऊ शकतं. पांढऱ्या चेंडूला सीम असेल हे पाहणं आवश्यक आहे. बॅट आणि बॉलमध्ये संतुलन आवश्यक. युवा खेळाडूंनी बॉलिंगकडे वळावं असं वाटत असेल तर एकतर्फीपणा टाळायला हवा. येत्या काही वर्षात या प्रश्नावरही काम होईल अशी आशा आहे’.
वर्ल्डकप मोहिमेविषयी
कुलदीप भारताचा नंबर वन स्पिनर असेल असं कुंबळे यांना वाटतं. ते पुढे म्हणाले, ‘आयपीएलच्या या हंगामातही त्याची कामगिरी उत्तम होते आहे. यशस्वी जैस्वाल प्रतिभावान खेळाडू आहे. एखाददुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला म्हणजे बाजूला करा असं होत नाही. वर्ल्डकपला अजूनही एक महिना आहे. तो उत्तम खेळतो आहे. वेस्ट इंडिजमध्ये खेळपट्या फिरकीला अनुकूल असतील. न्यूयॉर्कमधली खेळपट्टी ड्रॉपइन आहे. ट्वेन्टी२० वर्ल्डकपमध्येही फिरकीपटूंचं योगदान महत्त्वाचं असेल. भारतासाठी खेळणं नेहमीच प्रेरणादायी असेल. भारताकडे पॉवरहिटर्सची कमतरता नाही. खेळपट्टी आणि वातावरण पाहून खेळावं लागतं’.
राजस्थानच्या फॉर्ममध्ये घसरण पण ते पुनरागमन करतील
‘राजस्थान इतकं चांगलं खेळत होतं की ते गुणतालिकेत अव्वल असू शकले असते. ही खूप मोठी स्पर्धा आहे. थकव्याचाही मुद्दा असू शकतो. फलंदाजी क्रमात बरेच बदल केलेत. विदेशी खेळाडू जे होते त्यांना पूर्णपणे खेळवलेलं नाही. राजस्थानच्या खेळाडूंनी विश्रांती घेऊन नव्या ऊर्जेसह प्लेऑफमध्ये उतरावं’, असं कुंबळे यांना वाटतं.
वर्ल्डकप प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा
‘इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात नसतील हे खूप आधीच माहिती होतं. फ्रँचाइजींनाही याची कल्पना होती. संघांना पर्यायी खेळाडू निवडावे लागतील. सक्षम पर्याय असतील तर उत्तम नाहीतर फटका बसू शकतो. वर्ल्डकप प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा आहे. प्लेऑफचा भाग नसलेले भारतीय खेळाडू वर्ल्डकपसाठी रवाना होतील’, असं कुंबळे म्हणाले.