आयपीएलचा पंधरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब राहिला. या हंगामात मुंबई संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. सलग आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे मुंबईचे या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्याचे स्वप्न अपुरेच राहणार आहे. मुंबईची सध्याची खेळी पाहता हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य आहे. दरम्यान आता मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने मुंबईचा आतापर्यंतचा खेळ आणि चाहत्यांनी दिलेली साथ यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा >>> आयपीएलमधील पैशामुळे दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या मैत्रीत पडली फूट?; अँड्र्यू सायमंड्सने केला धक्कादायक खुलासा
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघात खेळण्याचा अनुभव आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना संदेश देण्यासाठी खास ट्विट केलं आहे. “या हंगामात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दिलेला नाही. मात्र अशा गोष्टी घडत असतात. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज यापूर्वी अशा परिस्थितीतून गेले आहेत. माझे मुंबई इंडियन्स संघ आणि या संघातील वातावरणावर खूप प्रेम आहे,” असे रोहित म्हणाला. तसेच पुढे बोलताना त्याने मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्याचे आभार मानले. “मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी आतापर्यंत आमच्यावरविश्वास आणि निष्ठा दाखवली, त्यामुळे त्यांचेही मला कौतुक करायचे आहे,” असेदेखील रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.
हेही वाचा >>> MI vs LSG : “…तर आम्हाला बदल करावे लागतील”; फलंदाजीतील वारंवार अपयशानंतर प्रशिक्षक महेला जयवर्धने व्यक्त केली चिंता
दरम्यान, मुंबई इंडियन्सने लखनऊविरोधातील सामना गमावला. या सामन्यांनतर मुंबईने या हंगामात सलग आठ सामने गमावले आहेत. या सामन्यानंतर मुंबई संघाची कुठे चूक झाली, यावर बोलताना रोहितने यापूर्वी सविस्तर भाष्य केले होते. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र आमच्या फलंदाजांनी चांगली खेळी केलेली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. एकातरी खेळाडूने ही जबाबदारी स्वीकारून मोठी खेळी करणे गरजेचे आहे, असे रोहितने म्हटले होते.