Rohit Sharma Statement in Impact Player Rule in IPL: मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमधील इम्पॅक्ट खेळाडू नियमाचा भारतीय क्रिकेटला फायदा नसल्याचे म्हटले आहे. या नियमाचा भारतीय क्रिकेटला कसा फायदा होणार नाही, हेही त्याने स्पष्ट केले. एका पाडकास्टमध्ये बोलताना रोहितने हे वक्तव्य केले. आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सचा पुढील सामना पंजाब किंग्जशी होणार आहे.
– quiz
रोहित एका पोडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, मला इम्पॅक्ट रुल फारसा भावलेला नाही. इम्पॅक्ट रुलमुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी झालं आहे. क्रिकेट हा ११ खेळाडूंचा खेळ आहे. सामने आकर्षक करण्यासाठी खेळात बदल केले जात आहेत.
इम्पॅक्ट खेळाडू नियमाबद्दल काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित या नियमाबद्दल सांगताना पुढे म्हणाला, नवीन नियम वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे सारख्या अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नाही. सुंदरला सनरायझर्स हैदराबादकडून कमी सामने खेळायला मिळतात, तर चेन्नई सुपर किंग्जकडून भरपूर धावा करणाऱ्या शिवम दुबेने आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजीच केलेली नाही. “आपण जर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मला वाटते की शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर सारखे खेळाडू गोलंदाजी करताना दिसत नाहीत, ही आमच्यासाठी (भारतीय संघासाठी) चांगली गोष्ट नाही.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला,”यातून काय साध्य होणार आहे माहित नाही. १२ खेळाडू सामन्यात खेळत आहेत, हे तुमच्यासाठी मनोरंजक असू शकते. सामन्याची स्थिती पाहता आणि खेळपट्टीचा विचार करून, तुम्ही इम्पॅक्ट खेळाडू निवडता. जर तुम्ही चांगली फलंदाजी केली आणि विकेट गमावल्या नाहीत तर तुम्ही एक गोलंदाज निवडता जो तुम्हाला सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाचा पर्याय देईल. तुम्हाला अतिरिक्त फलंदाजाची गरजच नाही कारण अनेक संघ चांगली फलंदाजी करत आहेत आणि सामन्यात सात किंवा आठव्या क्रमांकाचा फलंदाज क्वचितच मैदानावर येत असेल.”
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टही या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. नवीन नियम खेळाची अखंडता नष्ट करत आहेत, असे त्यांनी मत मांडले. याबाबत मत मांडताना गिलख्रिस्ट म्हणाले, “या नियमामुळे नवीन काहीतरी खेळात आले आहे आणि हा नियम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणण्यात आला आहे. क्रिकेटचा जो मूळ पाया आहे त्याच्याशीच तडजोड केली जात आहे. क्रिकेटच्या अखंडतेशी तडजोड केलेली नाही म्हणून ट्वेन्टी२० प्रकार मनोरंजक आहे. हा खेळ ११ खेळाडूंसह खेळला जातो, मैदान समान आकाराचे आहे आणि क्षेत्ररक्षणाची बंधने देखील समान आहेत. इतर काही नवीन करण्याची आवश्यकता नाही, मला वाटते की हे थोडे चिंताजनक आहे.”
“२००८ ते २०२३ च्या आय़पीएल हंगामांमध्ये २५० अधिक धावांची आकडेवारी दाखवली आहे आणि यामध्ये फक्त २ वेळा एवढी मोठी धावसंख्या गाठली. पण या वर्षी IPL मध्ये सुरूवातीलाच ४ वेळी २५० अधिक धावसंख्येचा आकडा गाठला आहे. ही वाईट गोलंदाजी नाही, खेळाडू फक्त खुल्या मानसिकतेने खेळत तुफान फटकेबाजी करतात. आजकाल T20 क्रिकेट असेच खेळले जाते.”