LSG vs MI IPL 2025 Rohit Sharma Sanjiv Goenka Video: लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत करत संघाविरूद्धचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. लखनौने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळला नव्हता. पराभवानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा लखनऊचे मालक संजीव गोयंका यांच्याशी बोलताना दिसला. दोघांमधील संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे.
शार्दुल ठाकूरने लखनौसाठी संघात दाखल झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात शार्दुलने भले एक विकेट घेतली असली पण त्याच्या १९व्या षटकातील गोलंदाजीमुळे सामना फिरला. मुंबईला विजयासाठी २ षटकांत २२ धावांची गरज होती. शार्दुलला १९वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. शार्दुलने भेदक गोलंदाजी करत या षटकात एकही बाऊंड्रीची संधी दिली नाही. परिणामी त्याने या षटकात फक्त ७ धावा दिल्या.
शार्दुलच्या या उत्कृष्ट षटकामुळे लखनौचा विजय जवळपास निश्चित झाला होता. शार्दुल ठाकूर लखनौच्या संघात बदली खेळाडू म्हणून सामील झाला होता. शार्दुल ठाकूर आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. पण जेव्हा लखनौचे २-३ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने लखनौने त्याला बदली खेळाडू म्हणून संघात सामील केले. पहिल्याच सामन्यापासून शार्दुलने आपल्या कौशल्याच्या आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. याचबरोबर तो संघाचा महत्त्वाचा गोलंदाजही बनला आहे.
रोहित शर्माने मुंबईविरूद्धच्या सामन्यानंतर ऋषभ पंत आणि संजीव गोयंका यांच्याशी बराच वेळ चर्चा करताना दिसले. दरम्यान लखनौचे मालक आपल्या संघाचा कर्णधार पंतच्या पाठीवर थाप देत शाबासकी दिली. एलएसजीने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित संजीव गोयंका यांना म्हणतो “सर, तुमच्याकडे लॉर्ड असताना चिंता कसली?”
सामन्यापूर्वीही रोहित आणि शार्दुलमध्ये मजेशीर संवाद पाहायला मिळाला. रोहित शर्मा सामन्यापूर्वी सरावादरम्यान लखनौच्या खेळाडूंना भेटण्यासाठी जात असतो. तितक्यात शार्दुल सराव थांबवत आणि म्हणतो, “थांब थांब रोहित शर्मा मैदानात फक्त एकाच व्यक्तीला भेटण्यासाठी येतो, तो म्हणजे लॉर्ड”. तितक्यात रोहितला शार्दुल हात मिळवत गळाभेट घेतो, हे ऐकताच रोहित म्हणतो, “हा स्वत:ला द लॉर्ड म्हणतोय…” आणि रोहितसह स्वत: शार्दुलही हसू लागतो.
पुढे शार्दुल म्हणतो, मग काय तूच तर हे नाव ठेवलं आहेस. नंतर रोहित झहीर खानला आवाज देत मिस्टर खान म्हणत त्याची भेट घेतो. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर मुंबई क्रिकेट संघाकडून एकत्र डॉमेस्टिक क्रिकेट खेळतात आणि एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत.