IPL 2025 Rohit Sharma Talking in Marathi Video GT vs MI: आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सचा पुढील सामना जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्सविरूद्ध होणारा हा सामना संघाच्या घरच्या मैदानावर अहमदाबादमध्ये होणार आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही संघांनी आपआपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसणार आहेत. यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अस्खलित मराठी बोलतोय.
मुंबई इंडियन्स संघाचा गुजरात टायटन्सविरूद्धचा हा सामना आज म्हणजेच २९ मार्चला खेळवला जाणार आहे. मुंबई संघाला मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तर गुजरात संघाला पंजाब किंग्सच्या संघाने पराभूत केले. त्यामुळे आज जो संघ जिंकणार तो गुणतालिकेत आपले खाते उघडणार आहे.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर कसून सराव करताना दिसले. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटताना, गप्पा मारताना, मजा मस्ती करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याय सरावादरम्यान रोहित शर्मा मराठीत बोलताना दिसत आहे. रोहितच्या या मराठीत बोलणाऱ्या व्हीडिओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
रोहित शर्मा या व्हीडिओमध्ये कॅमेरामॅनकडून आधी कॅमेरा घेतो आणि नंतर एक समोर एक फोटो काढण्याच्या तयारीत तो असतो. तितक्यात बाजूला एक जण असतो त्याला रोहित मराठीत म्हणतो, “अरे तुझाच वेट करतोय तू पण जा तिकडे हा खतरनाक ग्रुप आहे तिथे… आशिष नेहरा, सत्यजीत परब, पार्थिव पटेल, विक्रम सोलंकी… जा तिकडे, जा तर तिकडे मला एक फोटो काढायचा आहे…” तितक्यात समोरचा एक जण म्हणतो “आपण सेल्फी घेऊया…” तितक्यात रोहित म्हणाला… “मी येतो तू जा तर तिथे….” यानंतर कॅमेरामध्ये स्वत: रोहित शर्मा फोटो काढतो.
रोहित शर्माने ज्यांची व्हीडिओमध्ये नाव घेतली ते सर्व गुजरात टायटन्स संघाचा कोचिंग स्टाफचा भाग होते. यानंतर फोटो काढून झाल्यावर रोहित त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, “मी सांगत होतो की हा एक खतरनाक ग्रुप आहे आणि मला याचा एक फोटो क्लिक करायचा आहे.” त्या सर्वांना रोहित जाऊन भेटतो आणि सर्व जण त्याला हात मिळवत त्याची भेट घेतात.
मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वीचा रोहितचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुजरातविरूद्ध सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा खेळताना दिसणार आहे. गेल्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्त्व केलं होतं.