Rohit Sharma IPL 202 Viral Video: आयपीएल २०२५ ची सुरूवात रोहित शर्मासाठी फारशी चांगली राहिलेली नाही. सलामीवीर रोहित शर्मा सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. आता संघाचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध लखनौच्या घरच्या मैदानावर होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच्या रोहित शर्माच्या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रोहित शर्मा लखनौ संघाचा मेन्टॉर झहीर खानबरोबर मैदानात चर्चा करत होता. रोहित शर्माच्या बोलण्यावरून असं जाणवतं आहे की रोहित मुंबईच्या ताफ्यात आनंदी नाहीये, असं चाहते म्हणत आहेत.
मुंबई इंडियन्सने हा व्हीडिओ शेअर केला आहे. रोहित शर्मा आणि झहीर खान मैदानावर बोलत उभे असतात, तितक्यात ऋषभ पंत जाऊन रोहित शर्माला मागून मिठी मारतो. रोहित आणि ऋषभचं हे बॉन्डिंग पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. ऋषभ येताच रोहित आणि झहीरचं बोलणं थांबतं. पण रोहितचं बोलणं ऐकून सर्वच जण चकित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

रोहित शर्मा आणि झहीर खान नेमकं कोणत्या विषयावर चर्चा करत होते, याबद्दल कल्पना नाही. पण व्हीडिओमध्ये रोहित शर्मा झहीर खानशी बोलताना दिसला की, “जेव्हा करायचं होतं तेव्हा सगळं केलं, आता मला काही करायची गरज नाही.” रोहित शर्माची ही दोनच वाक्यं या व्हीडिओमध्ये ऐकू येत आहेत आणि तितक्यात मग ऋषभ पंत रोहितला मागून येऊन मिठी मारतो. रोहित आणि झहीरचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनीही यावर विविध कमेंट्स केल्या आहेत.

लखनौ संघाने रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि झहीर खान यांचा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ऋषभ पंतने रोहितला मागून मिठी मारल्यानंतर पंत आणि रोहित मस्ती करत असल्याचे दिसत आहेत. तर रोहितही झहीर खानबरोबर गप्पा मारत आहे. ‘आया है राजा’ हे गाणं लखनौने या व्हीडिओसाठी बॅकग्राऊंडला लावलं आहे.

रोहित शर्माकडून आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेतले होते. तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या संघाच्या कामगिरीतील सातत्यही कमी झालंय. मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये तीनपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. रोहित शर्मा फलंदाज म्हणून या तिन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करू शकलेला नाही.

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सलग तीन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने केवळ १३ धावा केल्या. रोहितने गुजरातविरुद्ध ८ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित आपले खातेही उघडू शकला नाही. केकेआरविरूद्ध सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता. रोहितचा फॉर्म पाहता तो लखनौविरूद्ध सामन्यात कशी कामगिरी करतो यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma viral video ahead of mi vs lsg match while talking to zaheer khan said now i dont need to do anything ipl 2025 bdg