पहिल्या सामन्यात तो वादळासारखा आला आणि संघाचा पालापाचोळा करून गेला. त्याच्या झंझावातापुढे पुणे वॉरियर्सला लोटांगण घालावे लागले होते. २३ एप्रिलला गेलने ६६ चेंडूंत नाबाद १७५ धावांची खेळी साकारत पुण्याच्या गोलंदाजीची लक्तरे काढली होती. त्यामुळे स्पर्धेत दुसऱ्यांदा ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात करणार असले तरी त्यांना धास्ती असेल ती ख्रिस गेलची. त्यामुळे आरोन फिन्चच्या पुण्याच्या संघापुढे गेलला झटपट कसे गुंडाळता येईल, हा पहिल्यांदा विचार असेल.
आयपीएलच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर बंगळुरूच्या संघाने १० सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत; तर पुण्याच्या संघाला १० पैकी फक्त २ सामने जिंकता आल्याने ते गुणतालिकेत तळाला आहेत.
पुण्याचा संघात सातत्याचा अभाव पाहायला मिळाला असून, फलंदाजी आणि गोलंदाजी ही त्यांची दोन्ही अस्त्रे प्रभावी ठरलेली दिसत नाहीत. फिन्च, स्टिव्हन स्मिथ यांचा अपवादवगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. रॉबिन उथप्पा, युवराज सिंग या दोघांना आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भरघोस पैसे खर्च करून संघात घेतलेल्या अभिषेक नायरला आतापर्यंत आपली छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारचा अपवादवगळता एकही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
बंगळुरूचा संघ पुण्यापेक्षा नक्कीच सरस असला तरी गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे गुरुवारच्या सामन्यात त्यांना विजयाच्या वाटेवर पुन्हा यावे लागणार आहे. ख्रिस गेल, विराट कोहली आणि ए बी डि’व्हिलियर्स हे फलंदाजीचे खांब आहेत, पण या तिघांनाही गेल्या दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. या तिघांपैकी एक जण शेवटपर्यंत उभा राहिल्यास बंगळुरूचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो. गोलंदाजांची चांगली फळी बंगळुरूकडे आहे. रवी रामपॉल, आर.पी.सिंग आणि विनय कुमार हे त्रिकूट प्रतिस्पध्र्याना काही वेळी भारी पडताना दिसत आहे.
दोन्ही संघांचा विचार केल्यास पुण्यापेक्षा बंगळुरूचा संघ नक्कीच वरचढ आहे. पुण्याला जर सामना जिंकायचा असेल तर पुन्हा आयुष्याच्या मशाली त्यांना पेटवाव्या लागतील. दुसरीकडे बंगळुरूचा संघ चांगलाच समतोल आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत पुण्यापेक्षा नक्कीच वरचढ आहे. त्यामुळे गुरुवारच्या सामन्यात पुण्यापेक्षा बंगळुरूचे पारडे नक्कीच जड असेल.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
गेल वादळाची पुण्याला धास्ती!
पहिल्या सामन्यात तो वादळासारखा आला आणि संघाचा पालापाचोळा करून गेला. त्याच्या झंझावातापुढे पुणे वॉरियर्सला लोटांगण घालावे लागले होते. २३ एप्रिलला गेलने ६६ चेंडूंत नाबाद १७५ धावांची खेळी साकारत पुण्याच्या गोलंदाजीची लक्तरे काढली होती.
First published on: 02-05-2013 at 05:25 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challangers bangaluru fight today with pune warriors