शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १७ वर्षानंतर चेन्नईत चेन्नई सुपर किंग्सला हरवण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात आरसीबीच्या संघाला ही किमया साधली होती. त्यानंतर चेपॉकवर चेन्नईविरुद्ध जिंकायला त्यांना १७ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. योगायोग म्हणजे त्या सामन्यातले दोन शिलेदार आजच्या लढतीतही होते. ते कालातीत शिलेदार म्हणजे विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी.

२१ मे २००८ रोजी चेपॉकवर झालेल्या लढतीत बंगळुरूचा तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर बंगळुरूला १२६ धावांचीच मजल मारता आली. राहुल द्रविडने कर्णधाराला आणि लौकिकाला साजेशी अशी ४७ धावांची संयमी महत्त्वपूर्ण खेळी साकारली. प्रवीण कुमारने २१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. १८ वर्षांच्या विराट कोहलीने १० धावा केल्या होत्या. चेन्नईकडून अॅल्बी मॉर्केलने ४ विकेट्स पटकावल्या. मनप्रीत गोणीने २ विकेट्स घेतल्या.

या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिल पटेल आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी ६० धावांची खणखणीत सलामी दिली. पार्थिव आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला महेंद्रसिंग धोनी बाद झाले आणि त्यानंतर चेन्नईची घसरगुंडी उडाली. फ्लेमिंगने ४० चेंडूत ४५ धावांची खेळी केली. सुरेश रैना, सुब्रमण्यम बद्रीनाथ, विद्युत शिवरामाकृष्णन यांच्यापैकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही आणि चेन्नईला ११२ धावांचीच मजल मारता आली. बंगळुरूने १४ धावांनी मुकाबला जिंकला. अनिल कुंबळेने ३ तर डेल स्टेनने २ विकेट्स घेतल्या. ३ विकेट्स आणि २ झेलसाठी कुंबळेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

१७ वर्षानंतर बंगळुरूने चेन्नईत विजय मिळवला आणि या लढतीत कोहली-धोनी खेळले. कोहलीने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली तर धोनीने नवव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत नाबाद ३० धावा केल्या.