RCB beat SRH by 35 runs : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४१ वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यामध्ये आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा ३५ धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील आरसीबीचा हा दुसरा विजय, तर सनरायझर्स हैदराबादचा तिसरा पराभव ठरला. आरसीबीने बरोबर एका महिन्यानंतर दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट-रजतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २०६ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १७१ धावांच करु शकला.

विराट-रजतने आरसीबीसाठी झळकावले अर्धशतक –

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून २०६ धावा केल्या. विराट कोहलीने या सामन्यात आरसीबीसाठी ४३ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या. त्याचबरोबर रजत पाटीदारने या सामन्यात २५० च्या स्ट्राईक रेटने २० चेंडूत ५० धावा केल्या. या दरम्यान पाटीदारने २ चौकार आणि ५ षटकार मारले. कॅमेरून ग्रीननेही २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी ठरली फ्लॉप –

२०७ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेडला केवळ १ धाव करता आली. एडन मार्करमनेही केवळ ७ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माने १३ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. सनरायझर्स हैदराबाद संघाने सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे संपूर्ण संघ २० षटकात ८ विकेट गमावून केवळ १७१ धावा करू शकला. शाहबाज अहमदने संघासाठी नाबाद ४० धावा निश्चित केल्या. कर्णधार पॅट कमिन्सनेही ३१ धावा केल्या. पण ते दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीकडून स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा आणि कॅमेरुन ग्रीने यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर विल जॅकने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकांत धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

आरसीबीने हैदराबादचा किल्ला जिंकला –

आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आपल्या घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवत आहे. या सामन्यापूर्वी, सीझनमधील हा एकमेव संघ होता. ज्याने घरच्या मैदानावर एकही सामना गमावला नव्हता. मात्र आरसीबी संघाने हे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने या मोसमात घरच्या मैदानावर २ सामने खेळले होते. हे दोन्ही सामने संघाने जिंकले होते. आरसीबीने बरोबर एका महिन्यानंतर आणि ६ पराभवानंतर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.

Story img Loader