चेन्नई सुपर किंग्सने आठव्या हंगामाची सुरुवात चार सामन्यांत चार विजयांसह केली. मात्र राजस्थान रॉयल्सने त्यांचा विजयरथ रोखला. रॉयल्ससमोर निष्प्रभ ठरलेल्या चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीद्वारे विजयपथावर परतण्याची संधी आहे.
ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स या त्रिकुटावर बंगळुरूची भिस्त आहे. मात्र या तिघांनाही यंदा मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश आले आहे. प्रचंड रक्कम खर्च करून ताफ्यात सामील करण्यात आलेल्या दिनेश कार्तिकला एकदाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकात मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा मिचेल स्टार्क भारतात दाखल झाला आहे. दुखापतीमुळे तो बंगळुरूसाठी खेळू शकला नव्हता. स्टार्क अंतिम अकरात आल्यास बंगळुरूची गोलंदाजी भेदक होऊ शकते. डेव्हिड वाइजने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र अबू नेचिम आणि वरुण आरोन यांनी सपशेल निराशा केली होती. युझवेंद्र चहलकडून बंगळुरूला मोठय़ा अपेक्षा आहेत.
चेन्नईसाठी ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ ही धडाकेबाज सलामीची जोडी महत्त्वाची आहे. सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीला सूर गवसल्याने बंगळुरूच्या चिंता वाढल्या आहेत. ड्वेन ब्राव्होमुळे संघाला संतुलितता मिळाली आहे. रवींद्र जडेजा सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरला आहे. आशीष नेहरा, ईश्वर पांडे आणि मोहित शर्मा या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे गेलचा झंझावात रोखण्यासाठी अश्विनची फिरकी निर्णायक ठरू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा