दिल्ली डेअरडेव्हिल्सची विजयाची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. पहिल्या चार सामन्यांत दिल्लीला पराभवाने लाल कंदील दाखवला. बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात दिल्ली गुणांचे खाते उघडेल का, याची उत्सुकता तमाम चाहत्यांना लागून राहिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात बंगळुरूला शेवटच्या चेंडूवर पराभवाचे तोंड पाहावे लागले. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना रुद्रप्रताप सिंगने रवींद्र जडेजाचा बळी मिळवला. पण हा चेंडू नो-बॉल असल्यामुळे बंगळुरूचे विजयाचे स्वप्न अधुरे राहिले. शेवटच्या क्षणी बंगळुरूने पत्करलेला हा दुसरा पराभव आहे. याआधी त्यांना सनरायजर्स हैदराबादकडून ‘सुपर-ओव्हर’मध्ये हार पत्करावी लागली होती. असे असले तरी आतापर्यंत पाच सामन्यांत तीन विजय मिळवल्यामुळे या सामन्यात बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे. गुणांचे खाते खोलण्यासाठी दिल्ली संघ आतुर असल्यामुळे बंगळुरूला त्यांच्याकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागणार आहे.
चारही सामने गमवावे लागल्यामुळे दिल्लीसमोरील चिंता वाढल्या आहेत. आणखी एक पराभव त्यांचे आयपीएल-६मधील स्थान डळमळीत करू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी ते आसुसलेले आहेत. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी आतापर्यंत तुफान फटकेबाजी करून संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. पण बंगळुरूच्या अन्य फलंदाजांना आणि गोलंदाजांना उपयुक्त योगदान द्यावे लागणार आहे. आघाडीच्या फलंदाजांवर अधिक अवलंबून राहणे बंगळुरूसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मयांक अगरवाल आणि करुण नायर यांना मधल्या फळीत कामगिरी उंचवावी लागणार आहे. त्याचबरोबर तिलकरत्ने दिलशान आणि डॅनियल ख्रिस्तियान या खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा बंगळुरूला आहे. रवी रामपॉल, विनय कुमार आणि रुद्रप्रताप सिंग यांनी चेन्नईविरुद्ध अखेरच्या षटकांमध्ये सुमार गोलंदाजी केली होती. त्यामुळे बाहेर बसलेल्या अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, अॅन्ड्रय़ू मॅकडोनाल्ड, ख्रिस्तोफर बार्नवेल, डॅनियल व्हेटोरी, हर्षल पटेल, के. पी. अप्पान्ना, पंकज सिंग आणि पी. प्रसान्त यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पराभवांची मालिका खंडित करण्याचा दिल्लीचा प्रयत्न राहणार आहे. दिल्लीला आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्यामुळे त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांना शानदार सुरुवात करून द्यावी लागणार आहे. ‘नजफगढचा नवाब’ वीरेंद्र सेहवागकडून आक्रमक खेळीची अपेक्षा दिल्लीला आहे. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत दोन अर्धशतकी खेळी साकारल्या असल्या तरी दिल्लीला विजयापासून वंचित राहावे लागले आहे. कर्णधार महेला जयवर्धनेही चांगल्या फॉर्मात नाही. आन्द्रे रस्सेल, मॉर्ने मॉर्केल, जीवन मेंडिस आणि जोहान बोथा यांनाही आपली छाप पाडता आलेली नाही. मॉर्केल, उमेश यादव, इरफान पठाण आणि आशीष नेहरा अशी वेगवान गोलंदाजांची फळी दिल्लीकडे असली तरी ते अद्याप फारसे चमकले नाहीत.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
जेम्स फॉकनर, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज
ट्विटरवरुन पाठिंबा देणाऱ्या तुम्हा सर्वाचे मनापासून आभार. राजस्थान रॉयल्सने रविवारी मिळवलेला विजय अतिशय समाधानकारक होता. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा