कर्णधार शेन वॉटसन व अजिंक्य रहाणे यांचा झंझावात तर ख्रिस गेल व विराट कोहली यांची तुफानी फलंदाजी यामध्ये श्रेष्ठ कोण ठरते, हीच राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या लढतीमधील विजेता संघ आयपीएलच्या ‘क्लालिफायर-२’मध्ये स्थान मिळवेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात यईल.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर बुधवारी रात्री आठ वाजता हा सामना होणार आहे. राजस्थान व बंगळुरू यांच्यात आतापर्यंत या स्पर्धेत चौदा सामने झाले आहेत. त्यापैकी सात सामने राजस्थानने, तर सात सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थानने २००८ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. बंगळुरू संघाने २००९ व २०११ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
 वॉटसनने केलेल्या धडाकेबाज शतकामुळेच शेवटच्या साखळी लढतीत राजस्थानने नुकतेच गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्याचा सहकारी अजिंक्य रहाणेने या स्पर्धेत यंदा तेरा सामन्यांमध्ये ४९८ धावा केल्या आहेत. या दोन खेळाडूंबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या यंदाच्या विश्वविजेतेपदाचे स्टार खेळाडू स्टीव्हन स्मिथ, जेम्स फॉकनर, तसेच दीपक हुडा, संजू सॅमसन, करुण नायर यांच्यावरही राजस्थानच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत फॉकनर, ख्रिस मॉरिस, प्रवीण तांबे, टीम साउदी, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी व वॉटसन यांच्याकडून राजस्थानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
बंगळुरूच्या फलंदाजीचे तीन आधारस्तंभ असलेल्या गेल, ए बी डी’व्हिलियर्स, कर्णधार कोहली यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असली तरी पहिल्या दहा फलंदाजांमध्ये त्यांना स्थान मिळालेले नाही. मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांना झोडपून काढण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हेच बंगळुरूच्या विजयाचे सूत्र असणार आहे. त्यांच्याबरोबरच दिनेश कार्तिक, सर्फराज खान यांच्याकडूनही फलंदाजीत चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, डेव्हिड वाइस यांच्याबरोबरच युवा खेळाडू यजुवेंद्र चहाल यानेही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. येथेही त्यांच्यावरच बंगळुरूची मुख्य भिस्त राहणार आहे. अर्थात गोलंदाजीपेक्षाही धडाकेबाज फलंदाजीवर बंगळुरूचे यशापयश अवलंबून राहणार आहे.

वेळ : रात्री ८ वा.पासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स व सोनी पिक्स वाहिनीवर.

डी’व्हिलियर्सचा कसून सराव!
डी’व्हिलियर्स हा साखळी सामन्यांनंतर आयपीएलमधून माघार घेणार असल्याची चर्चा होती, मात्र मंगळवारी त्याने सरावात भाग घेतला. त्याने केलेल्या नाबाद १३३ धावांच्या जोरावर बंगळुरू संघाने मुंबईविरुद्धच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळविला होता.

Story img Loader