Rajsthan Royals vs Royal Challengers Banglore IPL Match Updates : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६० वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका केला. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डुप्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. या धावांच्या जोरावर आरसीबीने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, या धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सर्व फलंदाजांची पुरती दमछाक झाली आणि आख्खा संघ ५९ धावांवर गारद झाला. त्यामुळे आरसीबीने या सामन्यात राजस्थानवर ११२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात राजस्थानचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वालला शून्यावर बाद केलं. त्यानंतर पार्नेलच्या गोलंदाजीवर जॉस बटलरही शून्य धावांवर झेलबाद झाला. राजस्थानची खराब सुरुवात झाल्यानंतरही कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि पार्नेलच्याच गोलंदाजीवर तो ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटलाही पार्नेलने १० धावांवर बाद केलं आणि आरसीबीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. शिमरन हेटमायरने १९ चेंडूत ३५ धावा कुटल्या. पण तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर झुरेल, आश्विन, झॅम्पा, संदीप शर्मा आणि आसिफही स्वस्तात माघारी परतले आणि राजस्थानचा संपूर्ण संघ गारद झाला. पार्नेलने ३ विकेट घेतल्या. तर ब्रेसवेल आणि कर्ण शर्माला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.
विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसनने सावध खेळी करून आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी केली. तसंच अनुज रावतने आक्रमक फलंदाजी करून ११ चेंडूत २९ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे आरसीबीने २० षटकात ५ विकेट गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. आसिफच्या गोलंदाजीवर विराट कोहली १८ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र ग्लेन मॅक्सवेल आणि डुप्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी केली. फाफने ४४ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. फाफ बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनेही धडाकेबाज फलंदाजी करून अर्धशतक ठोकलं. अनुज रावत ११ चेंडूत २९ धावांवर नाबाद राहिला. तर ब्रेसवेल ९ धावा करत नाबाद राहिला.