DC vs RCB Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेत रविवारी रोमांचक सामने पाहायला मिळाले. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर खेळताना लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा उडवला. तर डबल हेडरचा दुसरा सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्लीला घरच्या मैदानावर खेळताना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेजंर्स बंगळुरूला विजय मिळवण्यासाठी १६३ धावा करायच्या होत्या. या मैदानावर धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नव्हतं. दिल्लीच्या गोलंदाजांनी रॉयल चॅलेजंर्स बंगळुरूला सुरूवातीला ३ मोठे धक्के दिले. सलामीला आलेला जेकब बेथल ६ चेंडूत अवघ्या १२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलला खातंही उघडता आलं नाही. तो शून्यावर माघारी परतला. त्यानंतर करूण नायरच्या रॉकेट थ्रो मुळे रजत पाटीदारला पॅव्हेलियनची वाट धरावी लागली. तो अवघ्या ६ धावांवर माघारी परतला.

कृणाल पांड्या – कोहलीने जिंकून दिला सामना

सुरूवातीला मोठे धक्के बसल्यानंतर कृणाल पांड्या फलंदाजीला आला. टीम डेव्हिड फलंदाजीसाठी उपलब्ध असताना, कृणाल पांड्याला फलंदाजीला पाठवणं हाच या सामन्यातील टर्निंग पाँईंट ठरला. दोघांनी मिळून ११९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. कृणाल पांड्याने एका बाजूने तुफान फटकेबाजी केली, तर विराट कोहलीने त्याला साथ दिली. विराट ४७ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी करत माघारी परतला. तर कृणाल पांड्या शेवटपर्यंत उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला.

दिल्लीने केल्या १६२ धावा

या सामन्यात रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीकडून केएल राहुलला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुलने ४१ धावांची शानदार खेळी केली. तर उर्वरीत फलंदाजांची कामगिरी पाहिली, तर सलामीला आलेल्या अभिषेक पॉरेलने २८, फाफ डू प्लेसिसने २२ धावांची खेळी केली. शेवटी ट्रिस्टन स्टब्सने ३४ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सला २० षटकअखेर ८ गडी बाद १६२ धावा करता आल्या.