IPL 2025, Travis Head RCB vs Uber India Controversy: भारतात सध्या आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आहेत. गुरुवारी (१७ एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामना रंगला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघातील आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. मात्र, सामन्यानंतरही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी तो आपल्या फटकेबाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आयपीएल सुरू असताना खेळाडू वेगवेगळ्या जाहिराती करत असतात. आता याच जाहिरातीमुळे ट्रॅव्हिस हेडच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका जाहिरातीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उबर इंडियाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रॅव्हिस हेडने केलेल्या या जाहिरातीत ‘रॉयली चॅलेंज्ड बंगळुरु’असा उल्लेख करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आरोप करत म्हटले आहे की, या जाहिरातीत बंगळुरू शहराची आणि संघाची खिल्ली उडवली गेली आहे, त्यामुळे या जाहिरातीमुळे उबर इंडियाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
ट्रॅव्हिस हेड विरुद्ध आरबीसी, नेमकं प्रकरण काय?
जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे ब्रँडची प्रतिमा मलिन झाली आहे, असा आरोप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून करण्यात आला आहे. तसेच या जाहिरातीद्वारे थेट त्यांच्या ट्रेड मार्कवर हल्ला केला असून ही जाहिरात संघाला हिणवण्याच्या उद्देशाने केली गेली असावी, असा आरोपही करण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ ब्रँडिंग नव्हे, तर घोषवाक्यावरूनही डिवचल्याचा आरोप केला आहे. ‘ई साला कप नामदे..’ हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं घोषवाक्य आहे. आयपीएलमध्ये हा संघ आपल्या एकनिष्ठ असलेल्या चाहत्यांसाठी ओळखला जातो. मात्र, या जाहिरातीतून या घोषवाक्याची खिल्ली उडवली गेली असल्याचा आरोप संघाकडून करण्यात आला आहे.
आता पुढे काय होणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता उबर इंडिया काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक पाऊल पुढे टाकलं आहे, त्यामुळे त्यांना यु्क्तिवाद सादर करावा लागणार आहे. उबर इंडिया स्पष्टीकरण देण्यासाठी युक्तिवाद सादर करेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची बाजू भक्कम असेल तर उबर इंडियाला माघार घेऊन जाहिरात काढून टाकावी लागेल.