सलामीवीर रॉबिन उथप्पाने तडाखेबाज ७५ धावा करूनही पुणे वॉरियर्सला आयपीएल क्रिकेट सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. १८८ धावांच्या लक्ष्याला सामोरे जाताना पुण्याने २० षटकांत ९ बाद १७० धावा केल्या. ए बी डी’व्हिलियर्स सामनावीर ठरला.
बंगळुरूच्या घरच्या मैदानावर पावणेदोनशे धावांचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस गेलचा झंझावात रोखण्यात पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांना यश मिळाले. मात्र ए बी डी’व्हिलियर्सने शेवटच्या षटकात अशोक दिंडाला तीन चौकार व दोन षटकारांसह २६ धावा चोपल्या. त्यामुळेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील लढतीत रॉयल चॅलेंजर्सला पुण्यापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवता आले.
बंगळुरूची गेलसोबत सौरभ तिवारीला सलामीला पाठविण्याची चाल यशस्वी ठरली. पण गेलला २१ धावांवर बाद करण्यात टी. सुमनने यश मिळविले. भुवनेश्वर कुमारने गेलचा सुरेख झेल टिपला. तिवारीने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने ६.३ षटकांत ६३ धावा जमवीत संघाच्या डावाला आकार दिला. अशोक दिंडाने आपल्या पहिल्याच षटकात कोहलीचा त्रिफळा उडविला. तिवारीने ४५ चेंडूंत ५२ धावा केल्या. त्यानंतर मोझेस हेन्रिक्स व ए बी डी’व्हिलियर्स यांनी चौफेर टोलेबाजी करीत धावांचा वेग वाढविला. त्यांनी २९ चेंडूंमध्ये ६८ धावांची अखंडित भागीदारी केली. अब्राहमने सहा चौकार व दोन षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा