Royals Challengers Bangalore vs Punjab Kings Latest Score Updates : मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विराट आणि फाफने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी आयपीएल २०२३ मध्ये चौथं अर्धशतक ठोकलं. या धावांच्या जोरावर आरसबीने २० षटकांत ४ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला विजयासाठी १७५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
पंजाबकडून फिरकीपटू राहुल चाहरने चार षटकांत २४ धावा दिल्या. पण राहुलला एकही विकेट मिळवण्यात यश आलं नाही. सॅम करनच्या गोलंदाजीवर फाफ ६८ धावांवर खेळत असताना उंच झेल उडाला होता. परंतु, पंजाबचा विकेटकीपर जितेश शर्माने झेल सोडला आणि फाफला जीवदान मिळालं. त्यानंतर हरप्रीत बरारच्या गोलंदाजीवर आरसीबीला पहिला धक्का बसला. विराट कोहली ५९ धावा करून बाद झाला. विराटने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकून ५९ धावांची खेळी साकारली.
विराट बाद झाल्यानंतर बरारच्या दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. बरारने एकाच षटकात आरसीबीला दोन धक्के दिले. त्यानंतर फाफने आक्रमक फलंदाजी करून धावांचा आलेख चढता ठेवला. परंतु, नेथन एलिसच्या गोलंदाजीवर फाफ ८४ धावांवर झेलबाद झाला. फाफने ५६ चेंडूत ८४ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. नेथन एलिसने चार षटकांत ४१ धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर अर्शदीपने दिनेश कार्तिकला ७ धावांवर झेलबाद केलं.