हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवून आत्मविश्वास उंचावलेल्या राजस्थान रॉयल्सचा मुंबईविरुद्ध पराभवाला सामोरे जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी मुकाबला होणार आहे. ख्रिस गेल, विराट कोहली, तिलकरत्ने दिलशान आणि ए. बी. डीव्हिलियर्स ही चौकडी फॉर्ममध्ये असूनही मुंबई इंडियन्सकडून बंगळुरूचा पराभव झाला. हा पराभव विसरून जात विजयी पुनरागमन करण्यासाठी कोहलीचा संघ उत्सुक आहे. दुसरीकडे शेन वॉटसन आणि जेम्स फॉल्कनर या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भन्नाट फॉर्मच्या जोरावर राजस्थान बाद फेरीच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी आतुर आहे.
हैदराबादविरुद्ध जेम्स फॉल्कनरने २० धावांत ५ बळी घेत राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फॉल्कनरसह सिद्धार्थ त्रिवेदी, अजित चंडिला, केव्हिन कूपर चांगली कामगिरी करत असल्याने राजस्थानची गोलंदाजीची आघाडी भक्कम आहे. फलंदाजीत शेन वॉटसन फॉर्मात परतल्याने रॉयल चॅलेंजर्सची डोकेदुखी वाढू शकते. अनुभवी द्रविड तसेच अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी आणि ब्रॅड हॉज यांच्याकडून सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा आहे.
रॉयल चॅलेंजर्सची फलंदाजी ही यंदाच्या हंगामातील सगळ्यात स्फोटक फलंदाजीची फळी आहे. पुणे वॉरियर्सविरुद्ध ६६ चेंडूत १७५ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या ख्रिस गेलला रोखणे हे राजस्थानसमोरील मोठे आव्हान असेल. गेलचे तुफान रोखल्यास दिलशान, कोहली आणि ए. बी. डीव्हिलियर्स या त्रिकुटाला थोपवणेही राजस्थानसाठी खडतर असेल.
गोलंदाजीत चॅलेंजर्सना आपली कामगिरी सुधारावी लागेल. रवी रामपॉल, विनय कुमार, आर.पी. सिंग आणि जयदेव उनाडकत यांना कामगिरीला सातत्याची जोड द्यावी लागेल. मुंबई इंडियन्सने याच माऱ्याविरुद्ध १९४ धावांचा डोंगर उभारला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध या चुका टाळण्याचा प्रयत्न चॅलेंजर्सच्या गोलंदाजांना करावा लागेल.
या दोन संघांदरम्यान याआधी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात चॅलेंजर्सनी रॉयल्सवर सात विकेट्सनी मात केली होती. या पराभवाची परतफेड करण्याचा राजस्थान रॉयल्सचा मनसुबा असेल.
सामन्याची वेळ : दुपारी ४ पासून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा