Suryakumar Yadav vs Rashid Khan : मुंबई इंडियन्सचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरोधात १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. सूर्यकुमारने आयपीएलमधील पहिलं शतक ठोकण्याचा पराक्रम केला. सूर्यकुमारच्या शतकामुळं मुंबईने २० षटकात २१८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर राशिद खानने फलंदाजीचा जलवा दाखवून सूर्यकुमारच्या इनिंगला तोडीस तोड उत्तर दिलं. या सामन्यात राशिदने फक्त ३२ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. विशेष म्हणजे राशिदने या इनिंगमध्ये १० षटकार ठोकले. गुजरात धावसंख्येच्या खूप मोठ्या फरकानं पराभूत होण्याच्या जवळ होता. परंतु, राशिदने धडाकेबाज फलंदाजी करून संपूर्ण समीकरणच बदललं.
मुंबईने हा सामना २७ धावांनी जिंकला आणि त्यानंतर सूर्यकुमारला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. परंतु, सूर्यकुमारला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिल्यानं भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर पी सिंहने थोडी नाराजी व्यक्त केली. समालोचन कक्षात आर पी सिंगला विचारण्यात आलं की, प्लेयर ऑफ द मॅचचा खरा मानकरी कोण आहे? यावर सिंगने उत्तर दिलं की, मला वाटतं, राशिद प्लेयर ऑफ द मॅच असायला पाहिजे होता. त्याने गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही कमाल दाखवली. अशा परिस्थितीत फलंदाजी करणं कठीण असतं.पण राशिदने ते करून दाखवलं. माझ्या अनुशंगाने राशिद खान प्लेयर ऑफ द मॅच आहे.
राशिदने आतापर्यंत टी-२० मध्ये एकूण ५५१ विकेट घेण्याची कमाल केली आहे. याशिवाय राशिदने टी-२० करिअरमधील सर्वात मोठा वैयक्तित स्कोअर केला आहे. राशिदने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात फक्त ३२ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली. राशिदचा आयपीएलमधील हा पहिला अर्धशतक आहेच, परंतु, टी-२० क्रिकेटमध्ये अफगानिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा सर्वात मोठा स्कोअर आहे. राशिदने या इनिंगमध्ये १० षटकार आणि ३ चौकार ठोकले. टी-२० क्रिकेटमध्ये ८ व्या नंबरवर फलंदाजी करून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही राशिदच्या नावावर नोंदवला गेला आहे.