Sanju Samson’s reaction on defeat : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ६१वा सामना रविवारी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई घरच्या मैदानावर राजस्थानचा ५ विकेट्सनी पराभव करत प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचा दावा मजबूत केला. मात्र, राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग तिसरा पराभव आहे. सध्या राजस्थानचा संघ १२ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. संघाच्या सलग तीन पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन खूपच निराश दिसत होता. या पराभवासाठी त्याने फलंदाजांना जबाबदार धरले.
विरोधी संघाच्या मैदानावर राजस्थानचा सलग तिसरा पराभव –
राजस्थान संघाने या हंगामात आतापर्यंत चार सामने गमावले आहेत. त्यात गुजरात टायटन्सविरुद्ध घरच्या मैदानावर फक्त एकच सामना हरला आहे. त्यानंतर आता विरोधी संघाच्या मैदानावर त्यांचा सलग तिसरा पराभव आहे. या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, “मला वाटतं पॉवरप्लेनंतर विकेट संथ आणि दुहेरी होती. त्यामुळे पॉवरप्लेनंतर आम्हाला १७० धावांची अपेक्षा होती. मात्र, आम्ही २०-२५ धावा कमी केल्या. सिमरजीतने खरोखरच चांगली गोलंदाजी केली.”
सॅमसनला खेळपट्टीचा अंदाज घेता आला नाही –
विरोधी संघांच्या मैदानावर लागोपाठ तीन पराभवांबाबत सॅमसन म्हणाला, “दुसऱ्या संघाच्या मैदानावरील सामन्यातून काय अपेक्षा ठेवाव्यात याची आम्हाला खात्री नव्हती. आम्हाला वाटले की प्रथम फलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय आहे. इथे खेळायची सवय असल्याने सीएसकेला धावाचा पाठलाग कसा करायचा याची चांगली कल्पना होती, आम्हाला वाटले की दुसऱ्या डावात वेग कमी होईल, पण खेळपट्टी चांगली होती.”
हेही वाचा – IPL 2024: ‘काहीही न करता ४०० कोटी कमावता अन् तरीही…’ वीरेंद्र सेहवागने संजीव गोयंकासह पंजाबची केली धुलाई
प्लेऑफ्सबद्दल संजू सॅमसन काय म्हणाला?
चेन्नईच्या हवामानाबाबत सॅमसन म्हणाला, “तुम्ही रात्री खेळता तेव्हा दव असल्यामुळे पाठलाग करणे कठीण नसते. उन्हाळ्यात खेळपट्टी गरम होते त्यामुळे दुसऱ्या डावात खेळपट्टी संथी होईल, अशी मला अपेक्षा होती. प्लेऑफ्सबद्दल विचार करणे सामान्य आहे, आम्हाला आमच्या नियंत्रणात काय आहे, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि पुढील सामना जिंकण्याची आशा आहे.”