RR vs CSK Riyan Parag Fined IPL 2025: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मधील घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात चेन्नईचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात संदीप शर्माच्या २०व्या षटकातील भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने ६ धावांनी सामना जिंकला. राजस्थानचा नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा पहिला विजय होता. पण या विजयानंतर कर्णधार रियान परागला त्याच्या चुकीचा फटका बसला आहे.

राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे रॉयल्स संघाचे सुरूवातीच्या सामन्यात नेतृत्त्व करण्याची जबाबदारी रियान परागच्या खांद्यावर होती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रियानच्या नेतृत्त्वाखाली संघाला पराभवाचा धक्का बसला. पण तिसऱ्या सामन्यात मात्र संघाने ही चूक सुधारली आणि विजयाला गवसणी घातली.

कर्णधार रियान परागला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. IPL 2025 मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळणारा रियान पराग हा दुसरा कर्णधार आहे. त्याच्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानने चेन्नईविरुद्ध ६ धावांनी विजय मिळवला, त्यानंतर कर्णधार रियान परागला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास आयपीएल संघांच्या कर्णधारांना ही रक्कम द्यावी भरावी लागते.

रियान परागच्या आधी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला देखील IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. त्या सामन्यात, त्याने एका सामन्याच्या बंदीनंतर पुनरागमन केले होते. स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर ही बंदीही घालण्यात आली होती.

आयपीएलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, ‘स्लो ओव्हर रेटशी संबंधित रियान परागच्या संघाची ही पहिली चूक असल्याने, आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’

RR vs CSK: आरआर वि. सीएसके सामन्याचा लेखाजोखा

नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी उतरला. संघाची सुरुवात खराब झाली, कारण पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. तो लवकर बाद झाल्यानंतर, नितीश राणा आणि संजू सॅमसन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. नितीशने अवघ्या ३६ चेंडूंत ८१ धावांची खेळी खेळली, ज्यात दहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तर कर्णधार रियान परागने शानदार ३८ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला सुरूवातीलाच धक्के बसले. रचिन रवींद्र खाते न उघडताच बाद झाला. राहुल त्रिपाठीची बॅट लागली पण मोठी धावसंख्या करू शकला नाही. तर ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२५ मधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.