IPL 2025 RR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२५ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईचा संघ आरसीबीसमोर १९७ धावांचा पाठलाग करू शकला नाही. यानंतर १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान पुन्हा पराभूत झाला. सलग दोन पराभवांनंतर चेन्नईच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान दुसऱ्या पराभवानंतर बोलताना ऋतुराजला रहाणे आणि रायुडूची आठवण झाली.

राजस्थानने सीएसकेचा ६ धावांनी घरच्या मैदानावर पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडला अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणेची आठवण झाली. इतकेच नाही तर गायकवाड यांनी आपल्या फलंदाजीच्या क्रमावरही मोठे वक्तव्य केलं आहे. चेन्नईच्या फलंदाजी क्रमातील बदल, मधल्या फळीतील फलंदाज यामुळे संघाची फलंदाजी बाजू कमकुवत दिसत आहे.

ऋतुराज गायकवाड गेल्या मोसमापर्यंत सीएसकेसाठी सलामीवीराची भूमिका बजावत होता. मात्र आता तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसत आहे. सलामीच्या जोडीतील बदलामुळे चेन्नईला अजून दमदार सुरुवात करता आलेली नाही. रचिन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी तिन्ही सामन्यात काही विशेष काही करू शकले नाहीत.

सीएसकेच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये नितीशने कमालीची फलंदाजी केली. मिसफिल्डिंगमुळे ८-१० धावा जास्तीच्या दिल्या गेल्या. आम्ही संघ म्हणून त्या विभागात सुधारणा करत आहोत. १८० धावांचं लक्ष्य गाठण्याजोगं होतं. विकेट पाहता योग्य लाईन-लेंग्थने गोलंदाजी केली असती तर अधिक फायदा झाला असता. मी इनिंग्स ब्रेकमध्ये आनंदी होतो, राजस्थानचा संघ २१० धावा वगैरे करू शकत होता, पण १८० धावांचं लक्ष्य गाठण्याजोग होतं.”

मधल्या फळीतील फलंदाजीबाबत बोलताना म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू तिसऱ्या क्रमांकावर खेळत आले आहेत. त्यामुळे जर मधल्या फळीत मी थोडं उशिरा फलंदाजीला आलो तर फायदेशीर ठरेल आणि त्रिपाठी आक्रमक पवित्र्याने खेळेल. पण असंही फारसा फरक पडत नाहीय, कारण मला दुसऱ्या तिसऱ्या षटकातचं फलंदाजीला उतरावं लागतंय.”

पुढे गायकवाड म्हणाला, “मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे लिलावाच्या वेळीच ठरले होते आणि मला कोणतीही अडचण नाही. गरज पडल्यास मी स्ट्राइक रोटेट करू शकतो आणि जोखीम पत्करू शकतो. दुर्देवाने आम्हाला एक चांगली सुरूवात मिळत नाही. एकदा का चांगली सुरूवात मिळाली की सर्व गोष्टी बदलतील.”