RR vs CSK Live Streaming Views: एमएस धोनी हे क्रिकेट जगतातील एक मोठे नाव असून त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याचे विशेष स्थान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. मैदान कोणतेही असो, धोनीवर चाहत्यांचे प्रेम विशेष आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना षटकार मारत होता, तेव्हा जिओ-सिनेमावरील दर्शकांची संख्या २२ दशलक्ष ओलांडली होती. सध्याच्या २०२३ सीझनमध्ये Jio-Cinema या स्पर्धेच्या ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आतापर्यंतची सर्वाधिक प्रेक्षकसंख्या पाहिली गेली.
धोनीची लाईव्ह बॅटिंग पाहण्यासाठी रेकॉर्डब्रेक प्रेक्षक ऑनलाइन होते. राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात धोनी फलंदाजी करत होता तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची विक्रमी लक्षांपर्यंत पोहोचली होती. आयपीएल २०२३च्या दर्शकांची ही सर्वाधिक संख्या आहे. आयपीएलमध्ये काल रात्री राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. या सामन्यात, ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची संख्या जवळपास संपूर्ण काळ एक कोटीच्या वर होती. जसजसा सामना शेवटच्या षटकांकडे जात होता, तसतशी प्रेक्षकांची संख्याही वाढत होती. धोनी खेळपट्टीवर फलंदाजीला आल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली. २.२ कोटींहून अधिक क्रिकेट चाहते एकाच वेळी हा सामना पाहत होते.
विक्रमी प्रेक्षकांनी सामना पाहिला
शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षक श्वास रोखून सामन्यातील चढ-उतार पाहत राहिले. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा जुन्या दिवसांची झलक दाखवली. सर्वोत्तम फिनिशर समजल्या जाणाऱ्या धोनीने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारून सामना रोमांचक केला. मात्र, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव घेतली आणि चेन्नई सुपर किंग्जचा तीन धावांनी पराभव झाला. धोनीने १८८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आयपीएलचा हा रंजक सामना बुधवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला.
टाटा आयपीएल २०२३चे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर जिओ सिनेमाने मागील आठवड्याच्या शेवटी दर्शकसंख्येच्या बाबतीत चांगली सुरुवात केली. पहिल्या आठवड्याच्या शेवटी व्हिडिओ दृश्यांच्या संख्येने मागील संपूर्ण हंगामातील व्हिडिओ दृश्यांच्या संख्येला मागे टाकले. जिओ-सिनेमावरील व्हिडिओ रेकॉर्ड १४७ कोटींहून अधिक व्ह्यूज पाहिले. जिओ-सिनेमावर प्रति व्हिडीओ प्रति मॅच खर्च करण्यात येणारा वेळ देखील ६०% ने वाढला आहे.
राजस्थानने अव्वल स्थान गाठले
राजस्थान रॉयल्सचा चार सामन्यांमधला हा तिसरा विजय होता आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.