Delhi Capitals vs Rajasthan Royals Score Updates: आयपीएल २०२३चा ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रोमांचक सामना झाला. दोन्ही संघ आपला शेवटचा सामना गमावल्यानंतर मैदानात उतरले होते. अशा स्थितीत राजस्थान संघाने हा सामना ५७ धावांनी जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचे प्रयत्न केला. त्याचवेळी दिल्लीचा संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरला होता पण ट्रेंटने कॅपिटल्सचे बोल्ट टाइट करत मोठे झटके दिले. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो सपशेल अपयशी ठरला. दिल्ली केवळ १४२ धावाच करू शकली.
राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. दिल्लीचे खाते उघडण्यापूर्वीच दोन विकेट्स पडल्या होत्या. पृथ्वी शॉनंतर मनीष पांडेही तंबूत परतला. ट्रेंट बोल्टने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. मनीष पांडे पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. ट्रेंट बोल्टला हॅटट्रिक करण्याची संधी होती मात्र तो करू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट ३६ धावांवर पडली. रिले रुसो १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. रविचंद्रन अश्विनने त्याला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले.
कर्णधार वॉर्नरने ललित यादवला हाताशी घेत डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र ललित ३६ धावा करून बाद झाला. अष्टपैलू अक्षर पटेलही फारशी काही कामगिरी करू शकला नाही. रोवमन पॉवेल अवघे दोन धावा करून बाद झाला. अखेर डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकीय झुंजार खेळी अपयशी ठरली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ड आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर त्या पाठोपाठ रविचंद्रन अश्विनने २ आणि संदीप शर्माने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.
तत्पूर्वी, राजस्थानने आज पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी वादळी सुरूवात केली आणि ८.३ षटकांत ९८ धावा चढवल्या. यशस्वी ३१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर माघारी परतला. संजू सॅमसन (०) व रियान पराग (७) अपयशी ठरल्याने राजस्थानच्या धावांचा वेग मंदावला होता. बटलर व शिमरॉन हेटमायर या जोडीने तो वेग पुन्हा मिळवून दिला. बटलरने ५१ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा चोपल्या. हेटमायरनेही २१ चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी करताना १ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचले. राजस्थानने ४ बाद १९९ धावा करून दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे लक्ष्य ठेवले होते त्यापुढे दिल्लीने गुडघे टेकले.