Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २४ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला रोखत गुजरात टायटन्सने ३ विकेट्सनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पराग सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातला १९७ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात राशिद खानने शेवटच्या चेंडूवर गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात ६४ धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतरही संघाला सतत धक्के बसत राहिले पण शेवटी सामना रोमांचक झाला. राशिद खानने शेवटच्या षटकांमध्ये ११ चेंडूत २४ धावांची शानदार खेळी करत गुजरातच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरातकडून सुदर्शनने ३५ धावा केल्या. दरम्यान, कुलदीप सेनच्या घातक गोलंदाजीने गुजरातच्या मधल्या फळीला हादरा दिला होता. त्याने ३ महत्त्वाचे विकेट्स घेत गुजरातला बॅकफूटवर पाठवले होते. गिलने ४४ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली, मात्र दुसऱ्या टोकाकडून सहकार्य न मिळाल्याने सामना फसला होता.
१५ षटकांनंतर गुजरातची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १२४ धावा होती आणि त्यांना विजयासाठी अजूनही ७३ धावांची गरज होती. गुजरातसाठी शुबमन गिल तारणहार ठरला, तर त्याला १६व्या षटकात युजवेंद्र चहलने हुशारीने यष्टिचित केले. शेवटच्या ३ षटकात गुजरातला ४२ धावांची गरज असल्याने सामना फसला होता, राहुल तेवतिया आणि शाहरुख खानच्या रूपाने दोन तुफानी फलंदाज क्रीजवर होते. शाहरुखच्या ८ चेंडूत १४ धावांच्या खेळीने गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या, मात्र तो आवेश खानच्या हातून बाद झाला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी १५ धावांची गरज असल्याने सामन्यात जीवदान शिल्लक होते. दुसरीकडे, राशिद खानने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आयपीएल २०२४ मधील राजस्थानच्या विजयरथ ४ रोखला. राजस्थानकडून कुलदीप सेनने ३, युजवेंद्र चहलने २ आणि आवेश खानने एक विकेट घेतली.
हेही वाचा – RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
तत्पूर्वी पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १९६ धावा केल्या आणि गुजरातसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली. जैस्वाल पाच चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाला, तर गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या बटलरला केवळ आठ धावा करता आल्या. राशिद खानने त्याला बाद केले. या फिरकीपटूने अनुभवी फलंदाजाला टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्यांदा बाद केले.
सॅमसन-परागची तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी –
यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी डाव सांभाळला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची मोठी भागीदारी केली. या सामन्यात दोघांनी अर्धशतके झळकावली. युवा फलंदाज रियान पराग यंदा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने याआधी दोन अर्धशतके झळकावली असून या सामन्यातही परागने स्फोटक खेळी केली. दुसऱ्या टोकाकडून कर्णधार संजू सॅमसननेही आपली ताकद दाखवून दिली. परागने अवघ्या ४८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची शानदार खेळी केली. संजू सॅमसननेही ३८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. या सामन्यात गुजरात टायटन्सचे गोलंदाजी आक्रमण विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.