Rajasthan Royals vs Punjab Kings Match Updates: आयपीएल २०२३ मधील ६६ वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सला १८८ धावांचे लक्ष्य दिले

सॅम करण आणि जितेश शर्मा यांनी पंजाब किंग्जची धुरा सांभाळली –

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. पंजाब किंग्जचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अथर्व तायडे आणि लियाम लिव्हिंगस्टोनही लवकर बाद झाले. मात्र, सॅम करण आणि जितेश शर्मा यांच्यात चांगली भागीदारी झाली.

जितेश शर्माने २८ चेंडूत ४४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर सॅम करनने ३१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले. याशिवाय शाहरुख खानने २३ चेंडूत ४१ धावांची धडाकेबाज खेळी केली.

हेही वाचा – CSK Team: “…तर एमएस धोनी पुढील हंगामात खेळताना दिसेल”; माहीच्या खेळण्याबाबत रॉबिन उथप्पाने सांगितली महत्त्वाची अट

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची झाली धुलाई –

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर नवदीप सैनी हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. नवदीप सैनीने ४ षटकात ४० धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झाम्पाला १-१ यश मिळाले. मात्र, संजू सॅमसनच्या संघासमोर १८८ धावांचे लक्ष्य आहे, पण पंजाब किंग्ज राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकेल का?

राजस्थान रॉयल्सचे नेट रन रेट चांगले –

यावेळी पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्स सहाव्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनच्या संघाने ६ सामने जिंकले आहेत, तर ७ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे १२-१२ गुण असले तरी चांगल्या नेट रन रेटमुळे राजस्थान रॉयल्स संघ पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्सच्या वर आहे.