Rajasthan Royals vs Punjab Kings Highlights: आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचलेला दुसरा संघ राजस्थान रॉयल्स पंजाबविरूद्ध सामना खेळत आहे. राजस्थानच्या दुसऱ्या घरच्या मैदानावर म्हणजेच गुवाहाटीमध्ये हा सामना खेळवला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह चेन्नईकडून आजच्या सामन्यात नव्या फलंदाजाने पदार्पण केले. जगभरातील विविध लीगमध्ये खेळणारा टॉम कोहलर कॅडमोर याला पंजाबविरूद्धच्या सामन्यात सलामीवीराची भूमिका मिळाली. पण त्याच्या खेळीपेक्षाही त्याने गळ्यात घातलेल्या एका उपकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. फलंदाजीला उतरताना तो गळ्यात काहीतरी घालून उतरला होता, ते नेमकं काय होतं, जाणून घेऊया.
गळ्यात काय घालून उतरला होता कोहलर कॅडमोर?
टॉम कोहलर कॅडमोर एक उपकरण गळ्यात घालून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य वाटू लागले की हे काय आहे? कोहलरने आयपीएलपूर्वी बीबीएल आणि द हंड्रेडमध्येही हे उपकरण गळ्यात घातले होते. या उपकरणाला क्यू-कॉलर म्हणतात. क्यू-कॉलर डोक्याला दुखापत झाल्यास मेंदूला होणारी इजा टाळण्यास मदत करते. याशिवाय, हे उपकरण फुटबॉल आणि रग्बीसारख्या इतर खेळांमध्येही खेळाडू घालतात. खेळाडू जर खेळत असताना पडला किंवा चेंडू लागल्यास त्याचा धक्का हा कॉलर बँड शोषून घेतो. ज्यामुळे मेंदूला कोणताही धक्का बसत नाही आणि मोठा आघात झाल्यास खेळाडूचे संरक्षणही होते.
हेही वाचा- RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?
कोण आहे टॉम कोहलर कॅडमोर?
टॉम कोहलर कॅडमोर हा एक इंग्लिश क्रिकेटपटू आहे जो काऊंटी चॅम्पियनशिपमधील यॉर्कशायर संघाकडून खेळतो. टॉम कोहलर कॅडमोर आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी द हंड्रेड आणि बीबीएलमध्ये खेळला आहे. जगभरातील अनेक टी-२० लीगमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव कॅडमोरला आहे. त्याच्या टी-२० कारकिर्दीत त्याने १७० सामन्यांमध्ये १३६.३ च्या स्ट्राइक रेटने ४३४४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. आय़पीएलच्या पहिल्याच सामन्यात कॅडमोर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पण त्याच्या काही फटक्यांनी सर्वांना प्रभावित केले. कोहलर कॅडमोर २३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह १८ धावा करत बाद झाला.
राजस्थान रॉयल्सला पंजाब विरूद्धच्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रियान परागच्या ४८ धावांच्या जोरावर केलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने एक षटक राखून ५ विकेट्सने विजय मिळवला. सॅम करनच्या ६३ धावांच्या खेळीने पंजाबला सहज विजय मिळवून दिला. यासह राजस्थानला अखेरच्या टप्प्यात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.