IPL 2024, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सीएसकेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. चेन्नईच्या या विजयानंतर कर्णधार गायकवाडने फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या विकेट्सचे सामन्यातील टर्निंग पॉइंट असल्याचे सांगितले. लागोपाठच्या मध्यांतरातील या दोन विकेट्सनंतर, सीएसकेला आरसीबीवर पकड घट्ट करण्यात यश आले. याशिवाय कर्णधारपदाच्या दडपणाबाबतही ऋतुराज गायकवाडने वक्तव्य केले.
पहिल्याच सामन्यानंतर गायकवाड म्हणाला, “सुरुवातीची २-३ षटके सोडली तर आमचा सामन्यावर पूर्ण ताबा होता. मला १०-१५ धावा कमी झाल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं, पण मला वाटतं की सामन्याचा शेवटी आरसीबीने खूप चांगली फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फॅफच्या विकेट्स हे मोठे टर्निंग पॉइंट होते. आम्हाला तीन विकेट्स पटकन मिळाल्या ज्यामुळे आम्हाला पुढील काही षटकांमध्ये सामना नियंत्रित करण्यात मदत झाली. हाच खरा टर्निंग पॉइंट होता.”
IPL 2024 मध्ये प्रथमच सीएसकेचे कर्णधार भूषवत असलेल्या गायकवाडने सांगितले की, सामन्यादरम्यान मला कर्णधारपदाचा अजिबात दबाव जाणवला नाही. मी नेहमीच कर्णधारपदाचा आनंद लुटला आहे. कधीही त्याचा माझ्यावर अतिरिक्त भार असल्याचे मला जाणवले नाही. कॅप्टन्सी कशी हाताळायची याचा अनुभव मला आहे आणि अर्थातच माही भाई (एम एस धोनी) आहेतच.
सीएसकेच्या टॉप-३ फलंदाजांमधील एकाने जर १५ षटके फलंदाजी केली असती तर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे झाले असते, असे गायकवाड यांचे मत आहे. कर्णधार म्हणाला, “मला वाटते की आमच्या संघातील प्रत्येकजण उत्तम खेळाडू आहे, मला वाटते जिंक्स (अजिंक्य रहाणे) देखील खरोखर सकारात्मक खेळ खेळत आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका काय आहे हे माहित आहे आणि कोणत्या गोलंदाजाला फटकेबाजी करायची हेही माहित आहे. भूमिका स्पष्ट असल्यामुळे खरोखर मदत होते. २-३ गोष्टी अशा आहेत, ज्यावर काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण मला वाटते की टॉप-३ मधील कोणीतरी १५व्या षटकापर्यंत फलंदाजी केली असती तर ते अधिक सोपे झाले असते.”