Dinesh Karthik asked CSK captain Ruturaj Gaikwad : आयपीएल २०२४ चा हंगाम आता एका रोमांचक वळणावर पोहोचली आहे. केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आधीच प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता फक्त एकच जागा रिक्त आहे. यासाठी सीएसके आणि आरसीबी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. या दोन संघांमधील सामना १८ मे रोजी बंगळुरूत खेळवला जाईल आणि एक संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवेल. या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी दिनेश कार्तिकच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर ऋतुराज गायकवाडने मजेशीर प्रश्न विचारला आहे.
व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये कार्तिकने त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले होते.अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने कार्तिकला विचारले की त्याची पुढील आयपीएल फ्रँचायझी कोणती आहे? चेन्नई सुपर किंग्ज? यावर कार्तिकने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘भूमिका काय आहे ते सांग? तू मला कर्णधार बनवशील का?’ यासोबतच यष्टीरक्षक फलंदाजाने हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.
दिनेश कार्तिक हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो आणि त्याने अनेक वेळा या संघाचे नेतृत्व केले आहे. पण इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याला कधीही चेन्नई सुपर किंग्जकडूनखेळण्याची संधी मिळाली नाही. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या पॉडकास्ट ‘कुट्टी स्टोरीज’मध्ये बोलताना कार्तिकने एकदा सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू न शकल्याबद्दल त्याला खेद वाटतो.
हेही वाचा – T20 WC 2024 : “तो नवखा नाही, आता त्याला भारतासाठी सामने…”, गौतम गंभीरने संजू सॅमसनला दिला सल्ला
दिनेश कार्तिकने खुलासा केला होता की, आयपीएलच्या पहिल्या सत्रात त्याला खात्री होती की चेन्नई त्याला नक्कीच खरेदी करेल. कारण माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर चेन्नई संघाचा एक भाग होते. त्यांनी कार्तिकची रणजी ट्रॉफी, इंडिया अ आणि राष्ट्रीय संघातही निवड केली होती. कार्तिकसाठी त्यांच्या मनात नेहमीच सॉफ्ट कॉर्नर असायचा. कार्तिकने पुढे सांगितले की जेव्हा सीएसकेने एमएस धोनीसाठी बोली लावली, तेव्हा त्याला समजले की आता तो या संघाचा भाग होऊ शकत नाही.
एका जागेसाठी तीन संघांत शर्यत –
आता चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स हे तीन संघ प्लेऑफसाठी उरलेले एक स्थान पटकावण्यासाठी शर्यतीत आहेत. हैदराबादचे आता १३ सामन्यांतून १५ गुण आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणताही संघ १५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकत नाही. या स्थितीत सनरायझर्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. १३ सामन्यांनंतर चेन्नईचे १४ गुण आहेत. १८ मे रोजी संघाचा सामना बंगळुरूशी होणार आहे. बंगळुरू आणि लखनऊचे प्रत्येकी १२ गुण आहेत. तथापि, लखनऊचा नेट रन रेट खूपच नकारात्मक आहे आणि त्याची भरपाई करणे त्यांच्यासाठी कठीण होईल. अशा स्थितीत चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामना नॉकआऊट मानला जात आहे.