Chennai Super Kings vs Punjab Kings Highlights: चेन्नई विरूद्ध पंजाब सामन्यात चेपॉकच्या मैदानावर पंजाबने सीएसकेवर मोठा विजय मिळवला. चेन्नईने नाणेफेक गमावत ऋतुराज गायकवाडच्या ४८ चेंडूत ६२ धावांच्या खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६३ धावा केल्या होत्या. यासह चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने या हंगामात नवव्यांदा नाणेफेक हरला, याबाबत ऋतुराजने काय वक्तव्य केले आहे, जाणून घ्या.
पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, जो संघाच्या पथ्यावर पडला. चेन्नईने दिलेल्लया १६३ धावांचा पाठलाग करताना, जॉनी बेअरस्टो (४६) आणि रिली रूसो (४३) यांच्या प्रभावी खेळीच्या बळावर पीबीकेएसने १७.५ षटकांत ३ बाद १६३ धावांचा पल्ला गाठला. सुरुवातीला, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांनी घेतलेल्या दोन विकेट्समुळे पंजाबने चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
सामन्यानंतर नाणेफेक आणि पराभवाबद्दल बोलताना ऋतुराज म्हणाला, आम्ही ५०-६० धावा कमी केल्या. आम्ही आधी फलंदाजी करत होतो तेव्हा खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती पण नंतर ती फलंदाजीसाठी अनुकूल होती. दव पडल्याने परिस्थिती खूपच कठीण झाली होती. मागच्या सामन्यातही आम्ही मोठ्या फरकाने सामना जिंकल्यावर आश्चर्यचकित झालो होतो. काही गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्या हातात नाहीत.
“आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी करू शकलो असतो. गेल्या दोन सामन्यात आम्ही २००-२१० धावा करण्याचा चांगला प्रयत्न केला पण या खेळपट्टीवर धावा करणे सोपे नव्हते. या खेळपट्टीवर १८० धावा करणंही कमी पडलंच असतं. मोठी समस्या म्हणजे दुखापतीमुळे चहल मैदानाबाहेर गेला. सामन्यात तुम्हाला जिथे विकेट हवी होती, तेव्हा दोनच गोलंदाज तिथे होते. दवामुळे फिरकीपटू सामन्यात मागे पडले. अजून चार सामने हातात आहेत आणि आम्ही नक्कीच पुनरागमन करू.”
ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीबाबत मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, “मी सरावाच्या वेळी नाणेफेक जिंकण्याचा सराव केला आहे. पण त्याचा मला सामन्यात फायदा होत नाही. खरे सांगायचे तर मी जेव्हा नाणेफेकीला जातो तेव्हा मी जास्त दबावाखाली असतो.”
आयपीएलच्या या मोसमात ऋतुराजने चांगली कामगिरी करत आहे. त्याने १० सामन्यात ५०९ धावा केल्या आहेत आणि यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त्याने विराटला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. तो आता या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.