Sachin Tendulkar 50th Birthday Celebration: जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने नुकतीच आपल्या आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. संपूर्ण क्रिकेट जगतासोबतच इतर लोकांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने आता आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सचिनसोबतच्या या फोटोमध्ये त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर आहे. सचिनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तो आपला ५०वा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत अशा प्रकारे साजरा करत आहे. सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेला मुलगा अर्जुनलाही सचिन मिस करत आहे असे त्याने सांगितले.
सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह म्हणजेच त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसोबत दिसत आहे. सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो निसर्गाचा आनंद लुटताना दिसत होता. गावात पारंपारिक पद्धतीने जेवण बनवताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या छायाचित्रात सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह मातीच्या चुलीजवळ बसला असून तोंडाजवळ फुंकणी धरून त्यातून आग पेटवण्याचाचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “तुम्ही अर्धशतक झळकावतो हे दररोज नाही, पण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या लोकांसोबत सेलिब्रेट करण्याची ती वेळ असते. अलीकडेच मी माझा ५०वा वाढदिवस एका शांत गावात साजरा केला जिथे माझी टीम (कुटुंब) माझ्यासोबत होती.”
सचिन तेंडुलकरनेही या फोटोसोबत लिहिले आहे की, “या खास प्रसंगी मी माझा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मिस करत आहे जो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याचवेळी, सचिनच्या या कमेंटवर अनेक चाहत्यांनी लिहिले की, तू फक्त अर्जुनला मिस करत आहेस, “तू शुबमन गिलला मिस करत नाहीस का?” एका यूजरने लिहिले की, “या फोटोत गिल गायब आहे”, तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, “शुबमन गिलसाठी अन्न शिजवत आहेस का?” एका यूजरने लिहिले की, “हा फोटो शुबमन गिलसाठी काढला असावा.”
सचिनची क्रिकेट कारकीर्द
सचिनची क्रिकेट कारकीर्द सचिन २४ वर्षे देशासाठी खेळला. यादरम्यान त्याने जगभरात अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने कसोटीत ५१ आणि वनडेत ४९ शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ वेळा सामनावीराचा किताब पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४०७६ चौकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० धावा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर ६६४ सामन्यांमध्ये ३४,५५७ धावा आहेत. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात एकूण ६७३ धावा झाल्या होत्या.