भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याच्याकडे दोनशे कसोटी सामने खेळण्याची क्षमता आहे, त्यामुळेच त्याने हे सामने झाल्याखेरीज निवृत्त होऊ नये असे ऑस्ट्रेलियाचा द्रुतगती गोलंदाज ब्रेट ली याने येथे सांगितले. सचिनविषयी प्रसारमाध्यमांकडून बरीच टीका केली जात आहे. त्याने आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे असेही सतत सांगितले जात आहे मात्र निवृत्त होण्याचा निर्णय त्याच्यावर लादला जाऊ नये. हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याला दिले पाहिजे. जर एखाद्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर वीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे कारकीर्द झाली असेल, तर त्याला दोनशे कसोटी सामने खेळण्याचा निश्चित हक्क आहे कारण अशी कामगिरी अन्य कोणताही खेळाडू करू शकणार नाही असे ब्रेट ली म्हणाला.
सचिन याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारली आहे. १९८९ मध्ये कसोटी कारकीर्दीत पदार्पण केल्यानंतर त्याने आतापर्यंत १९८ कसोटी सामने खेळले आहेत. आणखी दोन कसोटी सामने खेळण्यासाठी त्याला नोव्हेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
जगातील सर्वाधिक धावा करणारा तो महान क्रिकेटपटू आहे. सर डॉन ब्रॅडमन व सचिन तेंडुलकर यांच्यात मी तुलना करणार नाही. दोघेही श्रेष्ठ फलंदाज आहेत.
मी जेव्हा क्रिकेटमध्ये कारकीर्दीस सुरुवात करीत होतो, तेव्हा माझ्यापुढे तोच आदर्श खेळाडू होता. आमच्या देशातही त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याने आणखी अनेक वर्षे खेळत राहावे, असे ली याने सांगितले.