Sachin Tendulkar reveals about BCCI captaincy offer : टीम इंडियाचा माजी महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना दिसला. आयपीएल २०२४ ची सुरुवात सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने झाली. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही काही काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आला होता, त्याच्यासोबत टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांचाही समावेश होता. यादरम्यान सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठा खुलासा केला. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
चेन्नई आणि बंगळुरुच्या पहिल्या सामन्यादरम्यान जिओ सिनेमावर कॉमेंट्री करताना, सचिन तेंडुलकरने बीसीसीआयने त्याला टीम इंडियाच्या कर्णधार बनण्याची ऑफर दिली होती, तेव्हाची गोष्ट सांगितली. सचिन तेंडुलकरने सांगितले की, “बीसीसीआयने २००७ मध्ये मला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, पण माझी शरीरयष्टी खूपच खराब होती. एमएस धोनीबद्दल माझे निरीक्षण खूप चांगले होते. त्याचे मन खूप स्थिर आहे, तो शांत आहे, तो सहजप्रवृत्तीचा आहे आणि योग्य निर्णय घेतो. त्यामुळे कर्णधारपदासाठी मी त्याच्या नावाची शिफारस केली.”
आता सोशल मीडियावर चाहतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, सचिन तेंडुलकर हा केवळ एक महान खेळाडू नाही, तर तो खूप बुद्धिमान व्यक्ती देखील आहे. त्याच्यासाठी त्याचा देश आधी येतो.
सामन्याबद्दल बोलायचे, तर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा ६ विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने ८ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला. चेन्नईकडून रचिन रवींद्रने ३७, अजिंक्य रहाणेने २७ धावा, शिवम दुबेने नाबाद ३४ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २५ धावा केल्या. तत्पूर्वी, गोलंदाजीत चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आरसीबीकडून अनुज रावतने सर्वाधिक ४८ धावांचे योगदान दिले.