Sachin Tendulkar Tweet Viral : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सोमवारी श्वास रोखून धरणारा सामना झाला. या सीजनचा आतापर्यंतचा अधिक रोमांचक सामना या दोन्ही संघांमध्ये झाला. ज्याप्रकारे रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकून कोलकाताला विजय मिळवून दिला, त्याचप्रमाणे या सामन्यात निकोलस पुरनने धडाकेबाज फलंदाजी करून लखनऊला विजयाच्या दिशेनं नेलं. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, पुरनने चौफेर फटकेबाजी करून लखनऊला या सामन्यात विजय मिळवून दिला. लखनऊ हा सामना जिंकल्यानंतर लगेचच सचिनचा एक ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
बंगळुरुने नाणेफेक जिंकून २० षटकात २ विकेट्स गमावत २१२ धावा केल्या होत्या. परंतु, सचिन तेंडुलकरने ट्वीट करत या धावा कमी असल्याचं सांगितलं होतं. सचिनने ट्वीट करत म्हटलं, “विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसच्या इनिंगने आरसीबीसाठी जबरदस्त लॉन्चपॅड दिलं आहे. ग्लेन मॅक्सेवेल आणि इतर खेळाडूंनी धावा करत मोठी धावसंख्या फलकावर उभारली. परंतु, या खेळपट्टीवर २१० धावांचा आकडाही कमी असल्याचं मला वाटतं.”
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने धावांचा पाऊस पाडला. फाफने ४६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार ठोकून ७९ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पण आख्ख्या स्टेडियममध्ये चर्चा रंगली ती फक्त फाफने मारलेल्या गगनचुंबी षटकाराची. लखनऊ सुपर जायंट्सचा लेग स्पिनर रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर फाफने जोरदार फटका मारत सर्वात लांब षटकार मारला. ११५ मीटर लांबीचा हा षटकार असल्याने चेंडू थेट स्टेडिमयबाहेर गेला. फाफने मारलेल्या या षटकाराची आयपीएलमधील सर्वात लांब षटकारांच्या इतिहासात नोंद झाली आहे.