Suryakumar yadav Smashes Six Video Viral : मुंबई इंडियन्सचा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने शुक्रवारी झालेल्या सामन्यात वानखेडे मैदानावर धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमारने ४९ चेंडूत १०३ धावांची नाबाद वादळी खेळी करून आयपीएमधील पहिलं शतक ठोकलं. या धावांच्या जोरावर मुंबईला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर मुंबईने गुजरात टायटन्सला १९१ धावांवर रोखून या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.
मुंबईने गुजरातचा पराभव तर केलाच पण सूर्या पुन्हा एकदा तळपल्याने आख्ख्या स्टेडियममध्ये फक्त ‘सूर्या सूर्या’चा नारा चाहत्यांनी लावला होता. मैदानाच्या चारही दिशेला गगनचुंबी षटकार ठोकणाऱ्या सूर्यावर दिग्गज खेळाडूंसह तमाम क्रिकेटप्रेमींनी स्तुतीसुमने उधळली. अशातच टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत सूर्यकुमारच्या एका शॉटचं विशेष कौतुक केलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा मेन्टॉर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं. सचिन ट्वीटमध्ये म्हणाला, सायंकाळी आकाशात सूर्या चमकला. सूर्यकुमारने संपूर्ण इनिंगमध्ये जबरदस्त शॉट्स मारले. पण मोहम्मद शमीला थर्डमॅनच्या दिशेनं ठोकलेला षटकार माझ्यासाठी खास होता. त्या शॉटचा अॅंगल क्रिएट करण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने बॅट फिरवली, ते इतकं सोपं नाहीय. सचिनने या ट्वीटमध्ये सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीलाही टॅग केलं आहे.
गुजरात टायटन्सचं १९ वे षटक सुरु असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने हा षटकार ठोकला. सूर्याची आक्रमक फलंदाजी पाहून समालोचक कक्षात रवी शास्त्री आणि केविन पीटरनस यांनीही आश्चर्य व्यक्त केला. दरम्यान, रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला.
त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला. परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली. मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली.