Sai Sudarshan Record In IPL 2025: साई सुदर्शन हा उभरता तारा गुजरात टायटन्स संघासाठी प्रत्येक सामन्यात चमकतोय. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातही साई सुदर्शनची बॅट चांगलीच तळपली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने डावाची सुरूवात करताना शतकी भागीदारी केली. साई सुदर्शनने या डावातही शानदार अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज खेळत आहेत. या फलंदाजांना या हंगामात हवा तसा सूर गवसलेला नाही. तर दुसरीकडे युवा फलंदाज साई सुदर्शनने आयपीएल २०२५ स्पर्धेत ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तो आयपीएल २०२५ स्पर्धेत ४०० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या अर्धशतकी खेळीसह त्याने निकोलस पूरनला मागे सोडून ऑरेंज कॅपवरही कब्जा केला आहे.

गुजरात टायटन्सची दमदार सुरूवात

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी मैदानावर आली. या दोघांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून ११४ धावांची भागीदारी केली. यादरम्यान साई सुदर्शनने ३६ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली.

आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत साई सुदर्शन अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ अर्धशतकं झळकावली आहेत. तर लखनऊ सुपरजायंट्सचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने ८ सामन्यांमध्ये ३६८ धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या जोस बटलरने ८ सामन्यांमध्ये ३४० धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने ८ सामन्यांमध्ये ३३३ आणि विराट कोहलीने ८ सामन्यांमध्ये ३२२ धावा केल्या आहेत.