Sandeep Sharma gets emotional after maiden IPL fifer : आयपीएल २०२४ चा ३८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. राजस्थानने हा सामना अगदी सहज जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला २० षटकांत ९ गडी गमावून १७९ धावा करता आल्या. मुंबई संघाचा पराभव करण्यात सर्वात मोठा वाटा संदीप शर्माचा होता. संदीप शर्माने मुंबईच्या फलंदाजांना टिकाव धरण्यास एकही संधी दिली नाही, ज्यामुळे त्याच्या गोलंदाजीसमोर मुंबईचा संघ खेळपट्टीवर डगआउट होताना दिसत होता. या उत्कृष्ट कामगिरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांमध्ये संदीप शर्माविषयीच्या चर्चा रंगतायत. यातच संदीप शर्मा मात्र भावनिक होताना दिसला.
संदीप शर्माची तुफान बॉलिंग
संदीप शर्माने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ षटकांत १८ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. संदीप शर्मा ५.४० इकॉनॉमीवर बॉलिंग करत होता. त्याने इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी अशा ५ विकेट घेतल्या.
…म्हणून संदीप शर्मा झाला भावूक
या सामन्यानंतर संदीप शर्माने सांगितले की, तो दोन वर्षे अनसोल्डमुळे खूप निराश, हताश झाला होता. यावर त्याने सांगितले की, मला दोन वर्षांपूर्वी कोणीही विकत घेतले नव्हते. बदली म्हणून माझा संघात समावेश करण्यात आला, त्यामुळे मी प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहे.
तो म्हणाला की, मी तंदुरुस्त झाल्यानंतर पहिला सामना खेळत आहे. मला बरे वाटत आहे. खेळपट्टी संथ आणि खालच्या बाजूची होती, त्यामुळे व्हेरिएशन आणि कटर बॉलिंग सुरू ठेवण्याची माझी योजना होती.
पंजाबने २०२२ नंतर संदीपला रिलीज केले, पण आयपीएल २०२३ मध्ये संदीप शर्मा जखमी प्रसिध कृष्णाच्या बदली म्हणून ५० लाख रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला. २०२२ च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.
राजस्थान विरुद्ध मुंबई स्कोअरकार्ड
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून १७९ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या डावात तिलक वर्माने ४५ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या, ज्यामध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. संदीप शर्माने तिलकची विकेट घेतली.
प्रत्युत्तरात राजस्थानने १८० धावांचे लक्ष्य सहज गाठले. राजस्थानने १८.४ षटकांत १ गडी गमावून १८३ धावा केल्या आणि हा सामना ८ चेंडू बाकी असताना ९ गडी राखून जिंकला. या डावात यशस्वी जैस्वालने ६० चेंडूंत १०४ धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. राजस्थानविरुद्ध मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.