Sanjay Manjrekar Statement On MS Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीबद्दल म्हटलं जातं की, ज्या खेळाडूला माहीचा सपोर्ट मिळतो, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. माही ज्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचं नशीबच पालटलं जातं. असं एकदा नाही, तर अनेकवेळा धोनीनं घेतलेल्या निर्णयानंतर पाहायला मिळालं आहे. करिअरच्या सुरुवातीलाच टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये शेवटचं षटक जोगिंदर शर्माला देणं किंवा रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंवर विश्वास ठेवणं, या गोष्टी धोनीनं उत्तम प्रकारे केल्या आहेत. संजय मांजरेकर यांनी एम एस धोनीनं कोणत्या खेळाडूंचं नशीब पालटलं आहे, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
इतकच नव्हे तर इंडियन प्रीमियर लीगच्या काही सामन्यांमध्येच धोनीने दोन खेळाडूंचं नशीब चमकवलं आहे. संजय मांजरेकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून धोनीचं कौतुक करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही खेळाडू अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे आहेत. रहाणेला कसोटी क्रिकेटमधून डच्चू दिला होता. ३५ वर्षांच्या रहाणेवर धोनीने बोली लावली, त्यानंतर काय रिझल्ट समोर आला, हे तुम्हाला माहितच असेल.
काही दिवसांपूर्वी रहाणेनं मुंबई इंडियन्सविरोधात ३३ चेंडूत ६१ धावा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर सोमवारी झालेल्या सामन्यातही रहाणेनं २० चेंडूत ३७ धावांची खेळी केली. शिवम दुबेसोबतही असंच काहिसं घडलं आहे. शिवम दुबेनं फक्त २७ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकार ठोकून ५२ धावा केल्या. त्यामुळे सिलेक्टर्सच्या नजरेत शिवम दुबेही चमकला. धोनीने या खेळाडूंवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. या खेळाडूंवरही मांजरेकरांनी स्तुतीसुमने उधळली.