LSG Owner Sanjiv Goenka Net Worth: आपयीएलचा यंदाचा हंगाम आता मध्यावर आला आहे. खेळाडूंच्या कामगिरीबरोबर मैदावरील उपस्थितीमुळे संघांच्या मालकांचीही चर्चा होऊ लागली आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचे अंबानी कुटुंबीय, सनराझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांची खूप चर्चा झाली आहे. आता इतर संघाच्या तुलनेत नवख्या असलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या संजीव गोयंका यांची मैदानावरील उपस्थिती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कोण आहेत संजीव गोयंका?

कोलकात्यातील प्रतिष्ठित गोयंका कुटुंबात जन्मलेले संजीव गोयंका हे आरपीएसजीचे (आरपी-संजीव गोएंका ग्रुप) अध्यक्ष आहेत. ते चालवत असलेल्या कंपनीत ५० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. ही कंपनी जागतिक स्तरावर कार्बन ब्लॅक, वीज, आयटी, किरकोळ उत्पादने, मीडिया, मनोरंजन, क्रीडा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय त्यांनी आयआयटी खरगपूरच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

शिक्षण आणि कुटुंब

संजीव गोयंका यांनी १९८१ मध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉम. पदवी प्राप्त केली. त्यांची पत्नी प्रीती गोयंका इंटीरियर डिझायनर आहेत. त्यांना शाश्वत आणि अवर्ण ही दोन मुले आहेत. त्यांचे भाऊ हर्ष गोएंका हे सुद्धा एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

गोयंकांची एकूण संपत्ती

२०२५ पर्यंत, संजीव गोयंका यांची एकूण संपत्ती ४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. याचे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ३४,००० कोटी रुपये इतके मूल्य आहे. ते भारतातील ६५ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, श्रीमंतीच्या बाबतीत जागतिक स्तरावर ते ८६९ व्या क्रमांकावर आहेत.

लखनौ जायंट्ससाठी ७ हजार कोटींची बोली

ऑक्टोबर २०२१ मध्ये, गोयंका यांनी लखनौ आयपीएल फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी ७०९० कोटी रुपयांची बोली लावली होती. मुकेश अंबानी यांनी मुंबई इंडियन्ससाठी दिलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम नऊ पट जास्त आहे.

गोयंका यांच्याकडे आधीच आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझी आणि एसए२० लीगमध्ये डर्बन सुपर जायंट्स फ्रँचायझी आहे. गोयंका यांच्याकडे देशातील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मोहन बागान सुपर जायंट्सची देखील मालकी आहे, जी इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये सहभागी होते.

आरपीएसजी ग्रुपचे प्रमुख संजीव गोएंका यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडच्या द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये मँचेस्टर ओरिजिनल्स फ्रँचायझी विकत घेतली आहे.