Sanju Samson Breaks Dhoni’s Record : आयपीएल २०२४ मधील ५६वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर २० धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ बाद २२१ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात राजस्थन रॉयल्सचा संघ ८ बाद २०१ धावाच करु शकला. या सामन्यात संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावा केल्या. यानंतर तो वादग्रस्त पद्धतीने झेलबाद झाला, ज्यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दरम्यान सॅमसनने या खेळीच्या जोरावर एमएस धोनीचा एक खास विक्रम मोडला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार करणारा भारतीय –
आता संजू सॅमसन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद २०० षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. संजू सॅमसनच्या आधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. संजूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याच्या १५९ व्या डावात हा टप्पा गाठला, तर धोनीने २०० षटकार मारण्यासाठी १६५ डाव घेतले होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. इतकंच नाही तर एकूण यादीबद्दल बोलायचं झालं तर ख्रिस गिल, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, किरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल यांच्यानंतर टूर्नामेंटमध्ये २०० षटकार ठोकणारा तो १०वा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार मारणारे भारतीय फलंदाज –
संजू सॅमसन – १५९ डाव
एमएस धोनी – १६५ डाव
विराट कोहली – १८० डाव
रोहित शर्मा – १८५ डाव
सुरेश रैना – १९३ डाव
हेही वाचा – IPL 2024: संजू सॅमसन Out की Not Out? इरफान पठाण-नवज्योत सिंग सिद्धू यांच काय आहे म्हणणं…
मूळचा केरळचा असलेला संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. तो सध्या आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा विराट कोहली आणि सीएकेचा ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सॅमसनने कॅपिटल्सविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनचा अलीकडेच वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.