Rajasthan Royals vs Punjab Kings Highlights: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ आधीच आयपीएल २०२४ साठी पात्र ठरला आहे. सध्या संघ पंजाब किंग्जविरुद्ध गुवाहाटीमध्ये संघ सामना खेळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने अवघ्या १४४ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनही मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि केवळ १८ धावा करत संजूबाद झाला. पण या छोट्या खेळीसह त्याने मोठ्या कामगिरी आपल्या नावे केल्या आहेत. सुरेश रैनानंतर आयपीएलमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.
सध्याच्या मोसमात संजू चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने राजस्थानसाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. त्याचा फॉर्म पाहता त्याला २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. संजूने आयपीएल २०२४ मध्ये ५०० धावांचा आकडा गाठला आहे. एका हंगामात राजस्थानसाठी मोठी धावसंख्या रचणारा पहिला सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याशिवाय २०१८ नंतर एका हंगामात ५०० अधिक धावा करणारा सॅमसन हा जोस बटलरनंतर दुसरा य़ष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
संजू सॅमसनला पंजाब किंग्जविरुद्ध मोठी खेळी खेळता आली नाही. पण या सामन्यात १० धावा केल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. संजू सॅमसनआधी सुरेश रैनाने ही कामगिरी केली होती. रैनाने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ४९३४ धावा केल्या आहेत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २८१५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
सुरेश रैना- ४९३४ धावा
संजू सॅमसन- ३००८ धावा
विराट कोहली- २८१५ धावा
एबी डिव्हिलियर्स- २१८८ धावा
मनीष पांडे- १९४२ धावा
आयपीएल २०२४ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ चांगली कामगिरी करत आहे. हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने जिंकले आहेत. राजस्थानचे १६ गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट अधिक ०.३४९ आहे. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएल २००८ चे विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा – IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
संजू सॅमसन २०१३ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने १६५ आयपीएल सामन्यांमध्ये ४३९२ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. या कालावधीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११९ धावा आहे.