Sanju Samson Fined For Breaching IPL Code Of Conduct: आयपीएल २०२४ मधील दिल्ली कॅपिटल्स वि राजस्थानच्या सामन्यानंतर बीसीसीआयने रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे. दिल्लीविरूद्धच्या या सामन्यात बाद झाल्यानंतर संजू सॅमसन पंचांशी वाद घालताना दिसला. त्याच्या विकेटनंतर मैदानात मोठा गदारोळही पाहायला मिळाला. संजू सॅमसनच्या या वर्तनावर बीसीसीआयने कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची वादळी खेळी केली. संजू सॅमसन या खेळीदरम्यान चांगल्या फॉर्मात दिसत होता, जर संजू शेवटपर्यंत मैदानात राहिला असता तर त्याने राजस्थानला नक्कीच विजय मिळवून दिला असता. पण १६व्या षटकात तो झेलबाद झाला. मुकेश कुमारच्या चेंडूवर मोठा फटका मारला, जो सीमारेषेवर उभ्या असलेल्या शाई होपने टिपला आणि त्याला झेलबाद केले. हा झेल टिपताना होपचा पाय सीमारेषेला लागला आहे की नाही, हे तपासण्यासाठी मैदानावरील पंचांनीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला.

संजू सॅमसनवर बीसीसीआयकडून मॅच फीच्या ३० टक्के दंड

तिसऱ्या पंचांनी संजूला बाद घोषित केले. पण संजू काही मैदानाबाहेर जायला तयार नव्हता आणि बाद झाल्यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला. त्यामुळे आता बीसीसीआयने पंचांच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याबद्दल संजूवर मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे.

बीसीसीआयने निवेदनात संजू सॅमसनला दंड ठोठावला असल्याचे म्हटले. या निवेदनात म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल २०२४ च्या ५६ व्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सॅमसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा मान्य केला आणि मॅच रेफरीचा निर्णयही स्वीकारला. आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson fined by bcci for argument with umpires after controversial dismissal in dc vs rr match ipl 2024 bdg