Kevin Pietersen’s big statement on Sanju : संजू सॅमसनच्या कर्णधारपदाला साजेशी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानचे ९ सामन्यांतून १६ गुण झाले असून ते आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. संजूने लखनऊविरुद्धच्या सामन्यात ३३ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. संजूने ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन संजूबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.
केविन पीटरसन संजूबद्दल काय म्हणाला?
स्टार स्पोर्टसवर बोलताना केविन पीटरसन संजू सॅमसनबद्दल म्हणाला, “मला यात काही शंका नाही की तो काही आठवड्यांत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला जाण्यासाठी उड्डाण घेईल. त्याने दबावाखाली खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्या प्रकारे त्याने आपल्या कर्णधारपदाखाली अनेक गोष्टी केल्या आहेत, त्याला तेवढा सन्मान मिळत नाही. ज्या परिस्थितीत तो धावा करत आहे, जर मी निवडकर्ता असतो, तर तो माझ्या पहिल्या पसंतींपैकी तो एक असता.”
सॅमसन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर –
संजू सॅमसन आयपीएल २०२४ मध्ये आपल्या शानदार कामगिरीने धुमाकूळ घालत आहे. सॅमसनने या हंगामातील ९ सामन्यात ७७ च्या सरासरीने आणि १६१.०९च्या स्ट्राईक रेटने ३८५ धावा केल्या आहेत. या काळात सॅमसनच्या बॅटमधून ३६ चौकार आणि १७ षटकार आले आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहली ९ डावात ४३० धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होऊ शकते. कारण आयसीसीने १ मे पर्यंत सर्व संघांना १५ खेळाडूंची यादी पाठवण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – IPL 2024: राजस्थानचा लखनऊ सुपरजायंट्सवर ‘रॉयल’ विजय, सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी
राजस्थान रॉयल्स १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम –
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सने आत्तापर्यंत ९ पैकी ८ सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. १६ गुणांसह संघ प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. आणखी एका विजयामुळे त्याला प्लेऑफचे अधिकृत तिकीट मिळेल. कर्णधारपदाबरोबरच संजूने फलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली आहे.