Sanju Samson Out or Not Out: आयपीएल २०२४ मध्ये पंचांचा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंगळवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनला झेलबाद घोषित दिले. पण संजू सॅमसन झेलबाद नसल्याची सोशल मीडियावर सुरू आहे. पण याआधीच सामना सुरू असताना समालोचक असलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मते संजू झेलबाद नव्हता. तर इरफान पठाणचे मत मात्र व्यक्त होते. हे दोघे सामन्यानंतरच्या चर्चेत या मुद्द्यावर चांगलेच भिडले. इरफान पठाणने त्यांच्या या चर्चेचा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, जो आता व्हायरल होत आहे.
दिल्लीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानची सुरूवात फारच खराब झाली. जैस्वाल आणि बटलर स्वस्तात बाद झाले. यानंतर राजस्थानचा डाव सावरण्याची जबाबदारी संजू सॅमसनने घेतली. एकाबाजूने विकेट पडत होते, पण संजू मैदानात पाय घट्ट रोवून उभा होता. पण या दरम्यानच संजू बाद झाला, पण त्याची ही विकेट वादग्रस्त ठरली आहे.
संजू सॅमसन कसा झाला आऊट?
मुकेश कुमारच्या १६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनने लाँग-ऑनच्या दिशेने एक फटका खेळला आणि चेंडू थेट सीमारेषेपर्यंत पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या शाई होपने त्याचा झेल टिपला. मात्र होपचा पाय सीमारेषेला लागला की नाही हे स्पष्ट नव्हतं. त्यामुळे मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलेत. पण मैदानावर लावलेल्या मोठ्या स्क्रीनमध्ये होपच्या एका पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला असे दिसत होते. मैदानावर उपस्थित असलेल्या संजू सॅमसननेही हे पाहिले आणि तो पंचांच्या निर्णयावर नाखूश होता आणि मैदानावरील पंचांशी याबाबत चर्चा करताना दिसला. संजू बाद झाल्यानंतरही मैदानाबाहेर जात नव्हता.
सुरुवातीला संजू पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, पण नंतर परत आला आणि पंचांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मैदानावरील पंच काही ऐकायला तयार नव्हते. निर्णय झाला असून तो बाद असल्याचे त्यांनी सांगितले. सॅमसनने रिव्हयू घेण्याचाही प्रयत्न केला पण तो बाद असल्याचे तिसऱ्या पंचांनीच घोषित केले. राजस्थानच्या डगआऊटमध्ये बसलेले प्रशिक्षक आणि खेळाडूही या निर्णयावर समाधानी नव्हते.
संजू सॅमसनच्या वादग्रस्त कॅचवर इरफान पठाण-नवज्योत सिंग सिद्धू भिडले?
भारताचे माजी फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सवर आमनेसामने आले. सिद्धूला वाटत होते की संजू सॅमसन नाबाद आहे, तर इरफानला वाटत होते की तो बाद आहे. इरफान तो बाद आहे हे समजावून सांगताना सांगितले की शाई होपने झेल टिपल्यानंतर त्याने स्वताला चांगले सावरले आणि यशस्वी झेल टिपला. सावरताना त्याचा पाय सीमारेषेला लागला नाही, कारण त्याचा पाय जर सीमारेषेला लागला असता तर रिप्लेमध्ये सीमारेषेचा भाग नक्कीच हलताना दिसला असता. पण व्हीडिओमध्ये असं काहीचं दिसलं नाही. यावरूनच इरफान पठाणचं मत तो बाद आहे, हे बरोबर असल्याचे त्याने समजावलं. यावर बराच वेळ विनोदी पद्धतीने या दोन दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये चर्चा होत होती. खुद्द इरफान पठाणने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संजू सॅमसन ४६ चेंडूत ८६ धावांवर खेळत होता. संजू जर सामन्यात शेवटपर्यंत टिकला असता तर संघाने नक्कीच विजय मिळवला असता. मात्र तो बाद झाल्यानंतर संघाने प्रयत्न केले मात्र विजयी धावसंख्या गाठता आली नाही.