Virender Sehwag Mocks MS Dhoni’s Wicket Keeping: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने काल (शुक्रवारी) आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव करून इतिहास रचला. बंगळुरूसाठी हा विजय ऐतिहासिक होता कारण त्यांनी १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या चेपॉक मैदानावर विजयाची चव चाखली होती.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ७ बाद १९६ धावा केल्या, यात कर्णधार रजत पाटीदारचे ३२ चेंडूत ५१ धावांचे योगदान होते. त्यानंतर बंगळुरूने आपल्या आव्हानाचा बचाव करताना चेन्नईला २० षटकांत ८ बाद १४६ धावांवर रोखले आणि ५० धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी त्यांच्याकडून माजी कर्णधार एमएस धोनीने यष्टीरक्षणासह फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. असे असूनही, धोनी फलंदाजीसाठी नवव्या क्रमांकावर आल्याने चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. यामध्ये माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने तर धोनीच्या फलंदाजी क्रमांकासह त्याच्या यष्टीरक्षणावरही भाष्य केले आहे.

या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी, धोनीने त्याच्या जुन्या शैलीतील यष्टीरक्षणाने चाहत्यांना प्रभावित केले. बंगळुरूच्या डावाच्या ५ व्या षटकात, धोनीने अत्यंत कमी वेळात नूर अहमदच्या चेंडूवर फिल सॉल्टला ३२ धावांवर यष्टीचीत केले.

४३ व्या वर्षीही धोनीची इतकी चपळता पाहूण चाहत्यांमध्ये धोनीची चर्चा सुरू झाले आहे. असे असले तरी, भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग मात्र, धोनीच्या यष्टीरक्षणाने इतका प्रभावित झाला नाही.

ते इतके खास नव्हते

क्रिकबझवर धोनीने फिल सॉल्टला यष्टीचित केल्याबाबत बोलताना सेहवाग म्हणाला, “असे नाही की ते इतके खास स्टंपिंग होते. कोणताही सामान्य यष्टिरक्षक ते करू शकला असता कारण त्याचा (सॉल्ट) पाय आधीच बाहेर होता आणि त्याने तो पुन्हा क्रिजमध्ये आणण्याचा प्रयत्नही केला नाही.”

या वयातही एमएस..

“धोनी आणि नूर अहमद यांच्यात काय संभाषण झाले हे मला माहित नाही. धोनीने नूरला बाहेर गोलंदाजी करायला सांगितले का? ज्यामुळे सॉल्टला क्रिझबाहेर येऊन फलंदाजी करावी लागेल. जर तसे असेल तर ते उत्तम आहे. पण तरीही, यात काही शंका नाही की एमएस या वयातही उत्तम यष्टीरक्षण करत आहे,” असे सेहवाग शेवटी म्हणाला.

दरम्यान बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही धोनीने १६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. यादरम्यान त्याने कृणाल पांड्याच्या सलग दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले. हे सामन्याचे अंतिम षटक होते. पण, तोपर्यंत चेन्नईच्या हातातून हा सामना निसटला होता.