IPL 2025 Shardul Thakur 13th Over KKR vs LSG: लखनौ सुपर जायंट्सने थरारक सामन्यात अखेरच्या चेंडूवर केकेआर संघावर ४ धावांनी विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली, पण गोलंदाजांनी हार न मानता अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान शार्दुल ठाकूरने एक नाट्यमय ओव्हर टाकली.

केकेआर विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना ई़डन गार्डन्स मैदानावर खेळवला गेला. रविवारी रामनवमी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आला होता. यानंतर हा सामना आज म्हणजेच मंगळवारी ८ एप्रिलला दुपारी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात शार्दुल ठाकूरने ११ चेंडूंचं एक षटक टाकलं.

शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठं षटक टाकलं. शार्दुलने ११ चेंडूंचं एक षटक टाकलं जे संयुक्तपणे आयपीएलमधील सर्वात मोठं षटक आहे. याद्वारे त्याने मोहम्मद सिराज आणि तुषार देशपांडे यांची बरोबरी केली. कोलकाताच्या डावाच्या १३ व्या षटकात शार्दुलने ११ चेंडू टाकले.

ऋषभ पंतने शार्दुलला १३वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. शार्दुलने तिसऱ्या षटकाची सुरूवातच पाच वाईड चेंडू टाकून केली. शार्दुल ठाकूर वाईड यॉर्कर टाकून फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवू पाहत होता. पण चेंडू वाईड जात होते. एका चेंडूवर त्याने रिव्ह्यू घेण्याची मागणी पण केली. पण लखनौकडे फक्त एकच रिव्ह्यू बाकी होता, त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला नाही. शार्दुलने पाच एक्स्ट्रा धावा दिल्यानंतर त्याच्या ६ लीगल चेंडूवर एकही बाऊंड्री मारण्याची संधी दिली नाही.

पाच वाईडनंतर शार्दुलने योग्य लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी केली आणि सहा चेंडूत ८ धावा दिल्या. पण महत्त्वाचं म्हणजे त्याने या षटकातील अखेरच्या चेंडूवर तुफान फटकेबाजी करत असलेल्या केकेआरच्या कर्णधाराला अजिंक्य रहाणेला झेलबाद केलं. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर केकेआर संघाने एकामागून एक झटपट विकेट गमावले. शार्दुलने नंतर आंद्रे रसेलला झेलबाद करत केकेआरच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं.

शार्दुलच्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून यापूर्वी खेळणाऱ्या सिराजने आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ चेंडूंचं षटक टाकलं होतं. या सामन्यात बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव झाला होता. तर तुषार देशपांडेने चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ चेंडूंचं षटक टाकलं होतं. ही घटना आयपीएल २०२३ मध्येच घडली होती. मात्र, त्यानंतरही चेन्नईने मुंबईला पराभूत केलं होतं.

शार्दुलने आयपीएल २०२५ मध्ये पाच सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या आहेत. दुखापत झालेल्या मोहसीन खानच्या जागी बदली खेळाडू म्हणून त्याला संघात सामील केले होते. यानंतर, लखनौसाठी गोलंदाजी आक्रमणाला सुरूवात करण्याची जबाबदारी घेत त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.