Shardul Thakur Comeback Story in IPL After Being Unsold: IPL 2025 च्या सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये भेदक गोलंदाजी करत शार्दुल ठाकूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आधी दिल्ली कॅपिटल्सला धक्का दिला आणि नंतर सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांना त्यांच्या घरच्या मैदानावर गुडघे टेकायला भाग पाडले. पहिल्या सामन्यात दोन तर हैदराबादविरूद्ध ४ विकेट्स घेत आयपीएल २०२५ च्या सुरूवातीलाच शार्दुल ठाकूरने ६ विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली. आयपीएल २०२५ लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर शार्दुल संघात कसा परतला, जाणून घेऊया.

लॉर्ड ठाकूर हैदराबादविरुद्ध ४ विकेट्स घेत लखनौच्या दमदार विजयाचा हिरो ठरला. त्याने आतापर्यंत ६ विकेट घेतल्या आहेत आणि ७ सामन्यांनंतर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. शार्दुल आयपीएल सुरू होईपर्यंत खेळणार हे निश्चित नव्हते पण आता त्याने पर्पल कॅपही जिंकली आहे. एका फोन कॉलमुळे शार्दुल ठाकूरची आयपीएलमध्ये कशी एन्ट्री झाली, जाणून घेऊया.

शार्दुल ठाकूर आयपीएल २०२५ मध्ये धुमाकूळ घातला असला तरी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो अनसोल्ड राहिल्याने त्याचं खेळणं कठीण होतं. तो आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता, परंतु मेगा लिलावापूर्वी त्याला रिलीज केले होते. २ कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात उतरलेला शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिल्याने आयपीएल २०२५ मध्ये खेळणं आता शक्य नसल्याचं त्याला वाटलं, पण रणजी ट्रॉफी खेळताना जहीर खानच्या एका फोन कॉलने त्याचं पुनरागमन निश्चित झालं.

IPL लिलावात अनसोल्ड राहिल्याबाबत शार्दुल ठाकूरचं मोठं वक्तव्य

लखनौ सुपर जायंट्स संघाचे चार मुख्य वेगवान गोलंदाज आकाश दीप, मयंक यादव, मोहसीन खान आणि आवेश खान दुखापतीमुळे एनसीएमध्ये होते आणि संघाला बदली खेळाडूची नितांत गरज होती. त्यामुळे संघाचे मेन्टॉर झहीर खानने शार्दुल ठाकूरशी संपर्क साधला. इतकंच नाही तर त्याची निवड झाली तर संघात तो नक्की खेळेल, असं आश्वासनही दिलं आणि तसंच झालं. शार्दुलनेच मॅचनंतर याचा खुलासा केला.

शार्दुलला सामनावीर म्हणून निवडण्यात आल्यानंतर मुलाखत घेताना त्याला विचारलं गेलं की, तू आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर तू परत यंदाचा सीझन खेळशील असं तुला वाटलं होतं का? यावर शार्दुल म्हणाला, “खरंतर नाही, मी माझे वेगळे प्लॅन्स केले होते. मी काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होतो. पण जेव्हा मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होतो, तेव्हा झहीर खान यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितले की तुला बदली खेळाडू म्हणून बोलावले जाऊ शकते. जर तुझी निवड झाली तर गोलंदाजी आक्रमणाला तू सुरूवात करशील. त्यामुळे यासाठी तयारी ठेव. यानंतर मी आयपीएल खेळण्याच्या झोनमध्ये आलो.”

पुढे शार्दुल म्हणाला, “चढउतार हे तर जीवनाचा भाग आहेत. मला आयपीएल लिलावात कोणीच निवडलं नाही, तो एक वाईट दिवस होता. पण मला माझ्या कौशल्यावर पूर्ण विश्वास होता.” टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी मोहसीन खान दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर झाला आणि लखनौ संघात शार्दुलला त्याची जागा मिळाली.